
पंढरपूर,टीम——-
शहरामध्ये आषाढी यात्रेची लगबग सुरू झाली असून प्रशासकीय यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. संतांच्या पालख्या व दिंड्या पंढरपूरकडे येऊ लागल्यामुळे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात भावीक भक्तांची गर्दी होत आहे, परंतु या भाविक भक्तांची सुरक्षा पूर्णपणे रामभरोशे असल्याचे विदारक चित्र पंढरपूर नवीन बस स्थानकामध्ये पहावयास मिळाले, कारण ज्या चौकीमध्ये पोलीस बंदोबस्तासाठी बसायला पाहिजे ती चौकी चक्क चार्जिंग पॉइंट झाल्याचे दिसून आले.
राज्यात उत्पन्नाच्या बाबतीत सर्वात मोठे बस स्थानक पंढरपूर शहरामध्ये आहे.या बस सानकात एकूण 28 फलट आहेत पंढरपूरला नेहमी भाविकांची गर्दी असल्याने हे बस स्थानक कायम हाउसफुल असते. याच बस स्थानकामध्ये भाविकांच्या विशेषता महिला भाविकांच्या सुरक्षेकरिता एक पोलीस चौकी बनवण्यात आली आहे. या पोलीस चौकीमध्ये बंदोबस्ताकरता पोलीस नेमले जातात परंतु वारंवार ही चौथी रिकामीच राहत असल्याचे धक्कादायक चित्र बस स्थानकामध्ये पहावयास मिळत असते.
सोमवारी सकाळी बस स्थानक परिसरात फेरफटका मारला असता ज्या चौकीमध्ये पोलीस पाहिजे त्या चौकीमध्ये चक्की एक प्रवासी बसून आपले मोबाईल चार्जिंग करत असताना दिसून आला, सदर प्रवाशाला विचारले असता मी एक ते दोन तासापासून बसलो आहे येथे कोणीही आले नाही मला कोणीही बाहेर जा असे म्हटले नाही असे त्यांनी सांगितले. सदर पोलीस चौकी बाबत व इथे दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्याबाबत अनेकदा वर्तमानपत्रांनी वृत्त प्रसिद्ध करून पोलीस प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु बस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असणारे पोलीस प्रशासन मात्र काही केल्या जागे होत नसल्याचे दिसत असल्यामुळेच नवीन बस स्थानकात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
सदरक्षणाय खलनिग्रनाय हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्या पोलीस प्रशासनाने भाविकांची सुरक्षा जर रामभरोशे ठेवली तर मात्र त्यांना शेवटी मदतीला पांडुरंगालाच बोलवावे लागणार आहे. पोलीस चौकीमध्ये बंदोबस्तासाठी नेमलेले कर्मचारी अनेकदा गायब राहत असल्याचे पहावयास मिळत आहे, यामुळे पंढरपूर मध्ये पोलीस अधिकाऱ्यांकडून भाविकांच्या सुरक्षेबाबत केलेल्या मोठमोठ्या घोषणा या चक्क शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बस स्थानकामध्येच कर्मचाऱ्यांकडून पायदळी तुडवल्या जात असल्याचे धक्कादायक चित्र संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे यामुळे हा प्रकार पंढरीतील कर्तव्यदक्ष पोलीस प्रशासनाला शोभणारा नाही,ही चर्चा मात्र बस स्थानक परिसरात रंगली आहे,कारण भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात आहे.