पंढरपूर, टीम——-
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात, रोपवाटिकेचे उद्घाटन कारखान्याचे चेअरमन आ.अभिजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, ही रोपवाटिका प्रामुख्याने ऊस पिकाच्या उच्च दर्जाच्या, रोग व कीड -प्रतिरोधक रोपांच्या निर्मिती आणि संशोधनासाठी तसेच केळीच्या उन्नत जातींच्या रोपांच्या निर्मिती साठी समर्पित असून जास्तीत जास्त सभासदांनी या रोपवाटिकेचा लाभ घ्यावा असे आवाहन कारखाना प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

याप्रसंगी आ. अभिजीत पाटील म्हणाले की, या नवीन सुविधेमुळे प्रामुख्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रोग-प्रतिरोधक, उच्च उत्पादनक्षमतेचे आणि दर्जेदार ऊस वाण मिळण्यास मदत होईल. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव व्ही एस आय, मांजरी व केंदीय ऊस संशोधन केंद्र, कोईमतूर इ. यांनी विकसित केलेल्या सुधारीत ऊस वाण उपलब्धते सोबतच ब्राझील मधील ऊस संशोधन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस रोपे तयार करण्यात यावीत जेणेकरून ऊस पिकाच्या उच्च प्रतिच्या रोपांची निर्मिती करण्यास मदत मिळेल. शेतकऱ्यांना रोपे स्वस्त दरात मिळावीत यासाठी ही रोपवाटिका एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

उसाच्या पिकातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी दर्जेदार रोपे अत्यावश्यक आहेत. तसेच साखर कारखान्याला दर्जेदार ऊस पुरवठा होणे हे उत्पादनाच्या दर्जावर परिणाम करते. ही रोपवाटिका केवळ रोपे तयार करणार नाही, तर ऊसावरील नवीन संशोधन, रोगांचे नियंत्रण यावर मार्गदर्शन देखील करेल. साखर कारखान्याच्या पातळीवर असे विवीध उपक्रम राबविल्यास शेतकरी सभासदांना याचा खूप फायदा होईल असे आ. पाटील यांनी सांगितले.

कार्यक्रमाला श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक, कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर, कृषी विभागाचे अधिकारी, कामगार, स्थानिक शेतकरी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
