पालकमंत्री व जिल्ह्यातील सर्व अधिकारी वारकऱ्यांसाठी टोल फ्री क्रमांकाप्रमाणे काम करतील
*पंढरपूर, टीम —–
गेले दोन दिवस झाले पंढरपूर मधील विठ्ठल मंदिर चर्चेचा विषय बनत आहे कारण राज्यातील आजी-माजी मंत्र्यांनी मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद असतानाही vip दर्शनाचा अट्टाहास धरल्यामुळे मंदिर समिती पुन्हा चर्चेत आली. वास्तविक पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी व्हीआयपी दर्शन बंद करण्याचे आदेश दिले असतानाही सत्तेतील काही आजी-माजी मंत्र्यांना व्हीआयपी दर्शन दिल्यामुळे व्हीआयपी दर्शन बंदीच्या पहिल्या दिवशी पूर्णपणे बोजवारा उडाला आहे यामुळे आता यामध्ये खुद्द पालकमंत्री जयकुमार गोरे यांना पुढे येत व्हीआयपी दर्शन बंदी बाबत कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता व्हीआयपी दर्शनाचा हट्ट करणाऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार का? हे पाहणे महत्त्वाचे झाले आहे

गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे वाखरी पालखी तळावर काही ठिकाणी पाणी साचले होते. तळावर पाणी साचलेल्या ठिकाणांची पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पाहणी करून आवश्यक ठिकाणी सिमेंट पाईप टाकावेत, मुरमीकरण करून पाण्याला उतार करावा, कोठेही खड्डे राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले. वारकरी भाविकांच्या सुविधेबाबत कोणतीही कमतरता भासणार नाही, याची दक्षता घेऊन सर्व यंत्रणांनी नेमून दिलेली कामे पूर्ण करावीत. सुविधांसाठी आणखी निधीची आवश्यकता असल्यास तो जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पंढरीत येणाऱ्या वारकऱ्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करावे. तसेच वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पंढरी नगरी सजवण्यात यावी. यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले असून स्वागत कमानींसह विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. आषाढीच्या निमित्ताने येणाऱ्या कोणत्याही वारकऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास त्यांनी थेट पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन किंवा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना फोन करावा. जिल्ह्यातील अधिकारी आणि पालकमंत्री वारकऱ्यांच्या सेवेसाठी टोल फ्री क्रमांकाप्रमाणे काम करतील आणि वारकऱ्यांच्या अडचणी सोडवतील,” असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभिजित औटी, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पंढरपूरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणारा वारकरी हाच व्हीआयपी आहे. त्यामुळे वारकऱ्यांना व्हीआयपी समजूनच सेवासुविधा पुरवल्या जात आहेत. म्हणूनच इतर कोणत्याही व्हीआयपींना विठ्ठल मंदिरात थेट दर्शन दिले जाणार नाही. वारकऱ्यांना सहज आणि सुलभ दर्शन मिळावे, यासाठीच आमचा प्रयत्न आहे.
—–जयकुमार गोरे,पालकमंत्री
