पंढरपूर,टीम —–
शहरातील ऐतिहासिक यमाई तलावाच्या प्रदूषणाचा वर्षानुवर्षांचा प्रश्न आता कायमचा सुटण्याच्या मार्गावर असून माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या विशेष पाठपुराव्याला मोठे यश मिळत असल्यामुळे पंढरपूर शहराच्या विकासामध्ये परीचारक परिवाराने पुन्हा एक मोठा मास्टर स्ट्रोक मारला असल्याचे पहावयास मिळत आहे.

पंढरपूर शहराचे पर्यावरण व आरोग्य जपणे आणि ऐतिहासिक यमाई तलावाचे संवर्धन करणे या ध्येयाने “पंढरपूर शहर भुयारी गटार योजना” टप्पा क्रमांक 4 ( मूळ किंमत 122 कोटी) अंतर्गत यमाई तलाव येथे 15 कोटी खर्चाच्या निधीतून उभारण्यात येत असलेल्या सिव्हेज पंपिंग स्टेशनचे काम सध्या वेगाने सुरू असून या कामाची पाहणी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केली.
यमाई तलावात थेट मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न केवळ चर्चेपुरता न ठेवता त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी परिचारक यांनी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला. त्यातून पंढरपूर शहर भुयारी गटार योजना टप्पा क्र. ४ अंतर्गत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला निधी उपलब्ध झाला.

तलावात सांडपाणी जाणार नाही; ‘ड्रेनेज’चा प्रश्न होणार कायमचा निकाली!—–
यमाई तलावाच्या दक्षिण बाजूला लक्ष्मी टाकळी परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. नैसर्गिक उतार तलावाच्या दिशेने असल्याने घरांमधून बाहेर पडणारे सांडपाणी थेट तलावात मिसळत होते. परिणामी तलावातील पाणी दूषित होणे, दुर्गंधी निर्माण होणे, जलचरांना धोका निर्माण होणे आणि परिसराच्या पर्यावरणावर परिणाम होणे अशा समस्या निर्माण झाल्या.

**ही परिस्थिती बदलण्यासाठी परिचारकांनी आखलेला हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.**
यमाई तलाव परिसरात उभारण्यात येणाऱ्या **९.९ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या सिव्हेज पंपिंग स्टेशनमध्ये** टाकळी ग्रामपंचायत हद्दीतील सांडपाण्यासह पंढरपूर नगरपरिषद हद्दीतील माळी वस्ती, राऊत मळा आणि मलपे नाला येथील सांडपाणी एकत्रित केले जाणार आहे.त्यानंतर हे सांडपाणी पंप करून योजनेअंतर्गत प्रस्तावित १३ दशलक्ष लिटर क्षमतेच्या सिव्हेज ट्रीटमेंट प्लांटकडे (STP) नेले जाणार असून, पुढे गोपाळपूर येथील मुख्य ड्रेनेज लाईनला जोडून त्यावर आवश्यक प्रक्रिया केली जाणार आहे.

परिचारकांच्या पाठपुराव्याचा ‘ग्राउंड इम्पॅक्ट’!
यमाई तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या वॉकिंग ट्रॅकमुळे सकाळ-संध्याकाळ हजारो नागरिक या परिसरात येतात. त्यामुळे तलावाचे केवळ सौंदर्य नव्हे, तर नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरण सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.
या कामाची प्रत्यक्ष पाहणी करताना प्रकल्पाच्या प्रगतीबाबत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी समाधान व्यक्त केले असून काम पूर्ण झाल्यानंतर यमाई तलावात जाणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

पाठपुरावा’ कागदावर नाही, कामाच्या रूपात दिसणार!
पंढरपूरच्या विकासाच्या प्रश्नांवर शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करणारे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला हा प्रकल्प आता प्रत्यक्ष जमिनीवर आकार घेत आहे. त्यामुळे १५ कोटींचा हा सिव्हेज प्रकल्प यमाई तलावाच्या स्वच्छतेसोबतच प्रशांत परिचारकांच्या विकासाभिमुख राजकारणाचीही झलक दाखवणारा ठरणार आहे.

या पाहणीवेळी उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक लक्ष्मणराव शिरसट, गटनेते भागवत बडवे, नगरसेवक अमोल डोके, ॲड.सुनील वाळुजकर, युवक नेते प्रणव परिचारक, पंचायत समिती सभापती शुभम आगावणे, लक्ष्मी टाकळीचे सरपंच औदुंबर ढोणे, ग्रामपंचायत सदस्य सागर कारंडे, नगरसेवक सौरभ थिटे यांच्यासह शरद माने, धर्मराज घोडके, अशोक शिंदे, गणेश शिंदे, ऋषिकेश भालेराव, बबन येळे, उमेश सर्वगोड, सागर सोनवणे, विजय देशपांडे, औदुंबर पोतदार तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ‘यमाई तलाव आणि सांडपाणी’ हा वर्षानुवर्षांचा प्रश्न इतिहासजमा होणार असल्यामुळे पंढरपूर शहराच्या सौंदर्यामध्ये मोठी सकारात्मक भर पडणार असल्याचेही दिसणार आहे.
