पंढरपूर, टीम —–
माझ्या मतदारसंघातील १५ हजार लोकांसोबत मी पंढरपुरात आलो आहे. विठुरायाचे दर्शन घेतल्यानंतर मी पालकमंत्री झाल्याची बातमी प्रथम माझ्या पत्नीने मला दिली. आज खरोखर मला आणि माझ्या कुटुंबाला पांडुरंग पावला, अशी भावनिक प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे नवे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आपल्या जामनेर मतदारसंघातील जवळपास 15 ते 20 हजार भाविकांना घेऊन रविवारी पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी सह पत्नी आले होते.यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी श्रींची मूर्ती व उपरणे देऊन त्यांचा सन्मान केला.

या प्रसंगी मंत्री गिरीश महाजन म्हणाले,’ऐतिहासिक कुंभमेळ्याच्या कामाला गती मिळेल. यापूर्वी कुंभमेळा मंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी होती. आता पालकमंत्री म्हणून ती आणखी वाढली आहे. नाशिक आणि कुंभमेळ्याला न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार.

नाशिक शहरातील ८० टक्के खड्डे बुजवले आहेत. उर्वरित खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. कायमस्वरूपी नाशिकला खड्डेमुक्त करायचे आहे.शहरातील सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत.नाशिक शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शहरात साडेचार हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत,’ असेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री पदासाठी मी कधीही आग्रह केला नाही. तरी मुख्यमंत्री आणि पक्षाने माझ्यावर ही जबाबदारी दिली. येणारा कुंभमेळा ऐतिहासिक होणार आहे. या निमित्ताने नाशिकचे रूप बदलायचे आहे. आम्ही कुठेही कमी पडणार नाही, असे आश्वासनही गिरीश महाजन यांनी दिले.

ठाकरेंचे मुंबईतील नगरसेवकही तयारीतच—–
संजय राऊत यांच्या जिभेला हाड नाही. एवढी बडबड करून काही उपयोग नाही. त्यांच्याकडे दोनच खासदार राहिले आहेत. आता मुंबई महापालिकेचे ठाकरे गटाचे नगरसेवकही तयारीतच आहेत, असे सूचक वक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. त्यांच्या विधानाने ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी राज्यातील एक तरी महापालिका निवडून आणून दाखवावी. एक जिल्हा परिषद आणून दाखवावी. खासदार, आमदार सोडून गेले. त्यांनी कितीही शब्दांची जुमलेबाजी केली तरी आता लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही.
