
..नाहीतर पंढरपुरात साठलेला कचरा पॅकिंग करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विमानाने पाठवू – गणेश अंकुशराव
पंंढरपूर, टीम——-
आषाढी वारी नंतर पंढरपूर शहर व परिसरात स्वच्छतेची मोठी कामे करून शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न झाला परंतु या प्रयत्नाला सध्या हरताळ फसला जात असल्याचे विदारक चित्र दर्शन रांग परिसरात पहावयास मिळत असून सावळ्या विठुरायाच्या दर्शना अगोदर भाविकांना मात्र घाणीतून वाट काढत काढत पुढे सरकावे लागत आहे. त्यामुळे मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.
श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ने शहरातील स्वच्छेतेसाठी दरमहा लाखो रुपयांचा ठेका दिला आहे, परंतु सदर ठेकेदारावराकडून स्वच्छता केली जात नसल्याने तातडीने हा ठेका रद्द करा अन्यथा पंढरपुरात साठलेला कचरा गोळा करून तो बॉक्समध्ये पॅकिंग करून विमानाने दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पाठवू! असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.
पंढरपुरातील स्मशान भूमी नजीक असलेल्या दर्शन बारी परिसरात पाहणी केली असता येथे ठिकठिकाणी कचरा व घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून आले आहे.
वास्तविक पाहता या ठिकाणी दररोज स्वच्छता करण्यासाठी श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मार्फत दरमहा दहा लाख म्हणजेच वर्षाकाठी एक कोटी वीस लाखांचा चुराडा केला जातो. मात्र कोट्यवधींचा ठेका घेऊनही सदर ठेकेदारामार्फत स्वच्छतेचे काम केले जात नसल्याने दर्शन रांग व मंदिर परिसरात, प्रदक्षिणा मार्ग अशा विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले आढळून येतेय. त्यामुळे हा ठेका मंदिर समिती ने रद्द करावा आणि भाविकांकडून देणगी स्वरुपात आलेल्या दानाची अशी उधळपट्टी थांबवावी अन्यथा आम्ही हा कचरा गोळा करून तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेसह आरोग्य मंत्री व संबंधित मंत्र्यांच्या घरी पार्सल पाठवून देऊ असा खणखणीत इशारा गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.
श्रीविठ्ठल मंदिराच्या जतन संवर्धन कामात झालेला घोटाळा उघडकीस आणल्यानंतर आता स्वच्छतेच्या ठेक्याबाबतही गणेश अंकुशराव यांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे एकच खळबळ उडाली असून मंदिर समितीचा गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे.
म्हणून पंतप्रधानानांना पाठवणार!——
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे तिर्थक्षेत्र पंढरी नगरी वर विशेष प्रेम आहे, त्यांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरी नगरीची कशी दुरावस्था झालीय, इथल्या मंदिर समिती प्रशासनाकडून कसा भ्रष्ट कारभार चालु आहे, भुवैकुंठ पंढरी नगरीत कसे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे? हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना समजावे, वस्तुस्थिती माननीय पंतप्रधानांना कळावी म्हणून आम्ही येथील साठलेला कचरा पंतप्रधानांना विमानाने पाठवण्याचा निर्णय घेतला आहे..
— गणेश अंकुशराव