
पंढरपूर,टीम
पंढरीमध्ये आषाढी यात्रा सोहळ्याची लगबग सुरू झाली असून प्रशासनासह अधिकारी वर्ग जोमाने कामाला लागला आहे परंतु यंदा वाखरी ता. पंढरपूर येथील शेवटचे रिंगण हे वारकऱ्यांसाठीच मोठे डोकेदुखी ठरणार असल्याचे पहावयास मिळत आहे कारण हायवेवरील लोखंडी बॅरिकेट्स व तिसंगी कालवा यामुळे मोठी कोंडी निर्माण होणार असून याबाबत नॅशनल हायवे प्रशासन मात्र बेफिकिर असल्याचे जाणवत आहे.
बाजीराव विहीर येथील मैदानात माऊलींच्या पालखी सोहळ्यातील आश्वाचे शेवटचे गोल तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अश्वांचे उभे रिंगण होत असते. याच ठिकाणी दोन्ही मुख्य पालख्यांसह इतरही संतांच्या पालख्या आणि पाच लाखांहून अधिक वारकऱ्यांची गर्दी रिंगण पाहण्यासाठी होत असते. येथील रिंगण सोहळा वारकरी संप्रदायात अनन्य साधारण महत्व असलेला सोहळा आहे. त्यामुळे दरवर्षी परिसरात लाखो वारकरी भाविकांचे गर्दी असते या रिंगण तळजावळून पालखी महामार्ग गेलेला आहे, येथे चौक असल्याने उड्डाण पूल आणि दोन्ही बाजूला सेवा मार्ग सोडण्यात आलेले आहेत. त्याच बरोबर रिंगण तळाच्या पूर्व बाजूने तिसंगी तलावाचा सुमारे आठ फूट खोल मुख्य कालवा दक्षिणोत्तर गेलेला आहे. या कालव्यात यात्रा काळात पाणी सोडले जाते,किंवा बऱ्याच वेळा पावसामुळे कालव्यात पाणी असते. शिवाय रिंगण तळाच्या बाजूचे सेवा रस्त्याच्या बाजूची जमीन काळी असल्याने पाऊस झाला की वारकऱ्यांना मुख्य रस्ता सोडून शेतातून चालणे अशक्य होते.शिवाय पालखी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी चार फूट उंचीचा सीमा संरक्षक कठडा करण्यात आलेला आहे. त्यामुळे रिंगण तळावरून बाहेर पडताना वारकरी, दिंड्यांसाठी केवळ अरुंद रस्ता उरतो. बाजूच्या चार पदरी मुख्य महामार्गावर जाताच येत नाही. परिणामी रिंगण संपताच पुढच्या मार्गाला लागण्यासाठी वारकऱ्यांची कोंडी होते. गर्दी पुढे सरकत नाही. यामुळे वारकऱ्यांची मोठी कोंडी होते हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. असे असतानाही नॅशनल हायवे प्रशासन व पालखी सोहळा नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. यामुळे वारकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या नुसत्याच फेऱ्या?—–
आषाढी यात्रा सोहळ्याचा आढावा काही महिने अगोदरपासूनच प्रशासनाकडून घेतला जात असतो जिल्हाधिकारी वारंवार फेऱ्या मारून आढावा बैठका घेतात परंतु ज्या मूलभूत समस्या व गरजा आहेत त्यांच्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असते संबंधित रिंगण सोहळा परिसरात असणारे बिनाकामचे लोखंडी बॅरिगेट्स काढून रस्ता वारी काळात मोठा केला गेला नाही तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नुसत्याच येरझऱ्या मारू नये अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.