
दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या ग्रामस्थांना गावगुंडाकडून दमबाजी
पंढरपूर,टीम—–
पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे ग्रामपंचायतीने गावांमध्ये संपूर्ण दारूबंदीचा ठराव सर्वानुमते मंजूर केला. याबाबत करकंब पोलीस ठाणे, राज्य उत्पादन शुल्क विभाग, तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांना निवेदनही पाठवण्यात आले. मात्र तरीसुद्धा गावात दारू विक्री सुरूच असून आतातर दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षालाच दमदाटी करण्याचा प्रकार खेडभोसे येथे घडला आहे.यामुळे पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली असून अवैध दारू विक्रेत्यांसमोर पोलीस व राज्य उत्पादन विभाग सपशेल हतबल झाल्याचे पहावयास मिळत आहे.
अवैध दारू विक्रीमुळे खेडभोसे गावातील अनेक प्रपंच उध्वस्त झाले असून आतापर्यंत प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे दारू विक्रेत्यांची मुजोरी वाढली आहे. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बंडू पवार यांनी पुढाकार घेऊन गावामध्ये दारूबंदी करण्यासाठी प्रयत्न केले. त्याबाबतचा ग्रामपंचायतीने ठराव सुद्धा केला.
मात्र काही दिवस दारू विक्री बंद झाल्यामुळे आर्थिक गणित कोलमडलेल्या दारू विक्रेत्यांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षालाच दमदाटी करून, तू दारूबंदी कशी काय करतो, तुला बघून घेतो, अशी धमकी दिली आहे.
सध्या राजरोसपणे गावामध्ये दारू विक्री सुरू असलेली पोलिसांना दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत अनेक ग्रामस्थांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, दारूबंदी करून ही गावामध्ये दारू विक्री सुरूच आहे. पोलीस गावात कारवाईसाठी येणार असल्याची माहिती अगोदरच या विक्रेत्यांना मिळत असून पोलीस येण्यापूर्वीच हे दारू विक्रेते सर्व माल दडवून ठेवतात, त्यामुळे पोलिसांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.पोलिसांना दारू न सापडल्यामुळे पोलीस गावामध्ये शंभर टक्के दारू विक्री बंद असल्याचे सांगत आहेत, मात्र पोलिसांच्या नाकावर टिच्चून गावामध्ये दारू विक्री सुरूच आहे.तर दुसरीकडे दारूबंदी साठी प्रयत्न करणाऱ्या जागृत ग्रामस्थांना हे दारू विक्रेते त्रास देत असून, तुला बघून घेतो, अशी दमदाटी सुरू केली आहे.
याबाबत करकंब पोलीस ठाणे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन दारू विक्री करणाऱ्या आणि दमदाटी करणाऱ्या गावगुंडांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे अन्यथा या दारू विक्रेत्या विरोधात मोठे जन आंदोलन उभा केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
कारवाईचा नुसताच पोकळ फार्स
गावात अनेक ठिकाणी दारू विक्री होत आहे.याबाबत सोशल मीडियावर काही व्हिडिओ वायरल झाले आहेत, मात्र तरीही पोलीस प्रशासनाकडून केवळ कारवाईचा नुसताच मोकळा देखावा केला जात आहे. जर कारवाई प्रामाणिक पणे पारदर्शी झाली तर गावात कुठेही दारू विक्री केली जाणार नाही परंतु पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क केवळ रडक्याचे डोळे पुसण्याचे काम करत असल्यामुळेच दारू विक्रेत्यांची दादागिरी या गावात वाढल्याचे पहावयास मिळत आहे.