
पंढरपूर मंगळवेढा रोडवर भीषण अपघात,बहिण भावाचा जागीच मृत्यू
पंढरपूर,टीम—––
पंढरपूर-मंगळवेढा मार्गावर गोपाळपूर हद्दीत कासार मळा येथे स्विफ्ट कार व आयशर टेम्पोचा झालेल्या भीषण अपघातात बहीण भावाच जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे चार वाजता घडली आहे. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी बहिणीला घेण्यासाठी गेलेल्या भावासह बहिणीवर काळाने झडप घातल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
ऋतुजा जाधव ही पुण्याहून राखी पौर्णिमेसाठी आपल्या गावी मंगळवेढा येथे येत असताना हा अपघात पंढरपूर नजीक कासार मळा येथे झाला.
अपघातातील मयत ऋतुजा जाधव ही शिक्षणासाठी पुण्याला होती, सोमवारी साजऱ्या होणाऱ्या रक्षणबांधनासाठी ती एस टी बसने पंढरपूरला आली. भाऊ रोहित जाधव हा तिला आणण्यासाठी पंढरपूरला गेला होता. तिला कारमधून घेऊन मंगळवेढा येथे घरी निघाला असता रस्त्यातच काळाने घाला घातला.
पंढरपूर हून मंगळवेढा कडे निघालेली स्विफ्ट कार क्रमांक एम एच १३ बी एन ६६४९ ची पंढरपूर कडे येत असलेला आयशर टेंपो आर जे ३६ जी ए ८९७१ शी समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये स्विफ्टचा चक्काचूर झाला असून स्विफ्ट मधील बहीण भाऊ जागीच ठार झाले आहेत.
मंगळवेढा येथील रोहित तात्यासो जाधव ऋतुजा तात्यासो जाधव अशी मयत बहीण भावाची नावे आहेत. दोघाही मयतांना पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे.