
पंढरपूर, टीम ——
दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी पंढरी नगरीमध्ये लाखोंच्या संख्येने आषाढी यात्रा सोहळ्यासाठी भाविक भक्त दाखल झाला आहे.मात्र भाविकांच्या गर्दीमध्ये परप्रांतीय फेरीवाल्यांची मोठी डोकेदुखी असल्याचे दिसून येत आहे.कारण फेरीवाल्यांना आवर घालताना पोलीस प्रशासनाला मात्र चांगलेच नाके नऊ येत आहे.
यंदाच्या वर्षी पावसाने मे महिन्यातच सर्वत्र दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे त्यामुळे यंदाची आषाढी यात्रा ही रेकॉर्ड ब्रेक होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असून त्याप्रमाणे प्रशासनाने काटेकोर नियोजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे पंढरी नगरीमध्ये आपल्या टीम सह ठाण मांडून बसले असल्यामुळे भाविकांसाठी अनेक सोयी सुविधा मिळाल्या आहेत. “स्वच्छ पंढरी सुंदर पंढरी” हे ब्रीदवाक्य घेऊन पंढरपूर नगर परिषदेने मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहर वाळवंट, 65एकर परिसर स्वच्छ करून शहरात आकर्षक रोशनाई केली असल्यामुळे पंढरी नगरीमध्ये आलेला भाविक सुखावला असल्याचे पहावयास मिळत आहे. परंतु भाविकांच्या गर्दीमध्ये मोठ्या प्रमाणात पर राज्यातून आलेले फेरीवाले हे डोकेदुखी ठरत आहेत शहरातील गजानन महाराज मठ परिसर, स्टेशन रोड, भक्ती मार्ग, प्रदर्शना रोड, गोपाळपूर रोड, या भागात फेरीवाल्यांनी मोठी गर्दी केली आहे या फेरीवाल्यांमुळे अनेकदा गर्दी, ट्राफिक जॅम असे प्रकार घडत आहेत फेरीवाल्यांना आवर घालण्यासाठी पोलीस प्रशासन वारंवार प्रयत्न करत आहे परंतु कुठेतरी बोळात लपायचे आणि पुन्हा रस्त्यावर येऊन खुल्या मनाने आपले सामान विकायचे असा प्रकार फेरीवाल्यांकडून वारंवार होत असल्यामुळे वारीच्या गर्दीत फेरीवाल्यांची मोठी डोकेदुखी वाढत आहे. या फेरीवाल्यांचा कायमचा बंदोबस्त झाला तर नक्कीच भाविक भक्तांना होणारा त्रास कमी होईल व रस्तेही गर्दी मुक्त होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.