
पंढरपूर, टीम——
श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिर अरण तालुका माढा या तीर्थक्षेत्रास राज्य शासनाने सर्वात मोठे गिफ्ट दिले असून तब्बल 150 कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिर अरण तालुका माढा क्षेत्रात अ वर्ग दर्जा घेऊन विकसित करण्याची घोषणा केली होती.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत श्री क्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिर अरण तालुका माढा या तीर्थक्षेत्रास अ वर्ग दर्जा देण्यात आला असून तीर्थक्षेत्राच्या विकासाकरता श्री क्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी मंदिर अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा” या नवीन योजनेस मान्यता देण्याचा प्रस्ताव दिनांक 17 जुलै रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर सादर करण्यात आला.मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये दीडशे कोटीच्या विकास आराखड्यास मान्यता दिली आहे.
सदर मंजूर आराखड्यामध्ये सभा मंडप भक्त निवास व अन्नछत्र, संत सृष्टी म्युझियम,दर्शन मंडप,स्वच्छतागृह, छत असलेली मार्गिका,देवस्थान प्रशासकीय कार्यालय, बस स्टॉप, मुख्य मंदिर जीर्णोद्धार व सुशोभीकरण, श्री विठ्ठल आणि श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचा ब्रॉन्झ पुतळा, स्कायवॉक, पाण्याची टाकी,जुनी विहीर जीर्णोद्धार व सुशोभीकरण, म्युझियम मीडिया रंगकाम व भिंती चित्रे, कमान व वाहन तळ, पालखी तळ सुधारणा, भूमी रचना व सौंदर्यकरण, पोचमार्ग सुधारणा, पाणीपुरवठा व ड्रेनेज लाईन, जलपुनर्भरण,कचरा संकलन प्रणाली, दिशादर्शक कार्यालय, साइन बोर्ड, विद्युतीकरण वाटनुकुलीक यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा इत्यादी विकास कामांचा समावेश होणार असून याबाबतचे शासन आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
सदर विकास आराखडा तयार करण्यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विशेष पाठपुरावा व प्रयत्न केले आहेत.
तीर्थ क्षेत्र अरण येथे दीडशे कोटींच्या विकास आराखड्यात राज्य शासनाने मान्यता दिल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विशेष आभार मानले आहे.
या आराखड्यामुळे तीर्थक्षेत्र अरण गावाचा मोठा कायापालट होणार असून महाराष्ट्रातील पहिल्या फळीच्या तीर्थक्षेत्रामध्ये नक्कीच अरण चा समावेश झाल्याचे पहावयास मिळणार आहे, भाविक भक्तांची मांदियाळी ही मोठ्या प्रमाणात श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या अरणमध्ये वाढणार असल्याचे दिसणार आहे.