
पंढरपूर, टीम—-
शहरामध्ये आषाढी यात्रेची लगबग सुरू झाली असल्यामुळे प्रशासनाने बैठकांचे सत्र सुरू केले असून भाविकांची गर्दी पंढरी नगरीत वाढू लागली आहे मात्र एकीकडे प्रशासकीय कामकाजाचा दिंडोरा तर दुसरीकडे मात्र प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे पहावयास मिळत आहे. पंढरपूर बस स्थानकामध्ये असलेली पोलीस चौकी रिकामी असून येथून दिवसाढवळ्या प्रवाशांची पळवा पळवी खासगी वाहतूकदारांकडून केली जात असल्याचे चित्र रविवारी सकाळी पहावयास मिळाले.
पंढरपूर बस स्थानक हे राज्यातील सर्वात मोठे बस स्थानक असून या बस स्थानकाचे उत्पन्नही सर्वाधिक आहे परंतु याच बस स्थानकात सुविधांचा वाणवा व प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे दिसत आहे. कारण गर्दीच्या प्रसंगी येथे कधीही पोलीस प्रशासन हजर नसल्याचे वारंवार दिसत असते त्यामुळे बस स्थानकावर वारंवार भुरट्या चोऱ्यांचे प्रकार होत असतात ही मालिका सतत सुरूच असते.
बस्थानकातील प्रवासांना सुरक्षा देण्यासाठी एक पोलीस चौकी निर्माण करण्यात आली आहे परंतु या पोलीस चौकीमध्ये किंवा बस स्थानकामध्ये जे पोलीस नेमलेले असतात ते दुर्मिळ असतात कधीतरी नजरेस पडतात, कायमस्वरूपी पोलीस तैनात झाले तर अनेक अवैधप्रकारही थांबतील. आगारात अवैध वाहतूकदारांनी तर मोठा कळस केला असून थेट वाहने बस स्थानकात घालून प्रवाशांची पळवा पळवी होत आहे याकडे आगार व्यवस्थापकासह पोलीस प्रशासनाचेही ही दुर्लक्ष होत आहे.
पंढरपूर मध्ये एकादशी,बारस व त्यानंतर सलग दोन ते तीन दिवस मोठी गर्दी असते.एसटी बसच्या माध्यमातून अनेक सवलती उपलब्ध झाल्यामुळे महिला व वयोवृद्ध नागरिक मोठ्या प्रमाणात बसणे प्रवास करत असतात परंतु त्यांना बस स्थानकात हवी ती सुरक्षा मिळत नाही. गर्दीच्या प्रसंगी तर अक्षरशा खिडक्या मधून प्रवासी चढून आपली जागा पकडण्याचा प्रयत्न करत असतात याप्रसंगी लहान मोठे अपघातही होतात तसेच अनेक महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ही लांबवले जातात परंतु तरीही हाकेच्या अंतरावर असलेले पोलीस प्रशासन हे मूग गिळून गप्प का राहत आहे असा सवाल उपस्थित होत आहे.
मोठ्या भोळ्या भाबड्या श्रद्धेने पंढरी नगरीमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतो परंतु दर्शनासाठी आल्यानंतर अगदी सुरुवातीपासूनच त्याला मनस्ताप व पश्चातापाचा सामना करावा लागत असतो त्यामुळे जाताना हा भाविक मोठ्या प्रमाणात नाराज होऊन पंढरीकडे पुन्हा कधीही न फिरण्याची मनाशी खुणगाठ बांधून आपल्या घराकडे परत असतो.
कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा कधी उगाराला जाणार?
बस स्थानक परिसरात जे पोलीस कर्मचारी नेमले जातात ते इतरत्र अनेकदा फिरताना पहावयास मिळतात त्यांनी जर डोळ्यात तेल घालून बस स्थानकात आपले कर्तव्य पार पाडले तर नक्कीच राज्यात भले मोठे असणारे पंढरीचे बस स्थानक हे सुरक्षित होईल व आपोआपच भाविकांची सुरक्षाही राखली जाईल आणि इतर सर्वच अवैध प्रकारांना आळा बसेल.