
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘निर्मल दिंडी’, ‘चरणसेवा’ आणि ‘आरोग्यवारी’ उपक्रमाचा समारोप
पंढरपूर,टीम—–
सर्व संतांनी निसर्गप्रेमाचा आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे, आपल्या नद्यांवर, निसर्गांवर प्रेम करायला शिकवले आहे. त्यामुळे विठुमाऊलीच्या दर्शनाला येताना त्यांचा संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम निर्मल दिंडीच्या माध्यमातून वारकरी करतात, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पंढरपूर पंचायत समिती आवारात ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्यावतीने आयोजित श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ‘निर्मल दिंडी’ तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या ‘चरणसेवा’ उपक्रम आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या ‘आरोग्यवारी’ उपक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल, कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, गृह राज्यमंत्री पंकज भोयर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार समाधान आवताडे, अभिजित पाटील, गोपीचंद पडळकर, सचिन कलशेट्टी, डॉ.बाबासाहेब देशमुख, देवेंद्र कोठे, विक्रम पाचपुते, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाची आस लाऊन पंढरपूर येथे पोहोचतात. वारी दरम्यान वारकऱ्यांना येणाऱ्या अडचणीचा विचार करुन २०१८ वर्षीपासून निर्मलवारी सुरुवात केली. याअंतर्गत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली. सर्व दिंडीमधील वारकऱ्यांनी या संकल्पनेचा स्वीकार केला, त्यामुळे पालखी तळावर घाणीचे साम्राज्य दिसत नाही. महिलांची मोठ्या प्रमाणात सोय झाल्यामुळे वारीमध्ये त्यांची संख्या वाढलेली आहे. आपली वारी निर्मल, स्वच्छ झाली आहे.
ग्रामविकास आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्मलवारी संकल्पना यशस्वीरित्या राबविली, त्याचबरोबर निर्मल दिंडीच्या माध्यमातून लोककलावंत लोकजागर करुन स्वच्छतेबाबतचा संदेश घरोघरी पोहचविण्याचे काम करीत असतात. विठुरायाच्या दर्शनाची आस लाऊन चालणाऱ्या पावलांची सेवा करून विठुरायांच्या चरणाची सेवा केल्याचे प्रत्यंतर यावे, या सेवाभावाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाद्वारे चरणसेवा उपक्रम राबवून वारकऱ्यांचे सेवा केली. त्यांचे आरोग्य आरोग्य व्यवस्थित ठेवण्याचे काम केले.
वारकऱ्यांची सेवा ही मोठी संधी असून वारीचे चांगल्या प्रकारचे नियोजन करण्याचे प्रशासनाला निर्देश देण्यात आले होते. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला सोबत घेऊन वारीचे अतिशय उत्तम नियोजन केले. वारकऱ्यांना जर्मन हँगरच्या माध्यमातून राहण्याची व्यवस्था, महिलांकरीता स्वच्छतागृहासह स्नानगृह, पायाचे मसाज अशा आवश्यक त्या सर्व सुविधा वारकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला, नवीन उंची गाठत एक उच्चांक निर्माण केला आहे. त्यामुळे यावर्षीच्या वारीचे वेगळेपण पहायला मिळत आहे. सेवा कधीच संपत नसते, सेवेचे नवीन उच्चांक गाठायचे असतात. याकरिता प्रयत्नपूर्वक वारकऱ्यांची सेवा केली पाहिजे, असेही श्री. फडणवीस म्हणाले.
वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करुन दिल्या -ग्रामविकास मंत्री
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वारी सर्वोत्तम व्हावी, वारकऱ्यांना त्रास होता कामा नये, याकरिता त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी प्रशासनासोबत विविध सेवाभावी संस्था, विश्वस्त आदी घटकांनी अहोरात्र कामे करत मनोभावी सेवा करीत आहे. वारकऱ्यांकरिता पालखीतळावर सुविधा देण्याच्यादृष्टीने जर्मन हँगरसह, वैद्यकीय सुविधा, महिलांकरिता शौचालय, स्वच्छतागृहे, मसाज मशीन आदी सर्वोत्तम सुविधा वारकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला. वारी दरम्यान प्रशासनाच्यावतीने केलेल्या व्यवस्थेबाबत वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी श्री. फडणवीस यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले, तसेच निर्मल दिंडी यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या वतीने पालखी सोहळ्यात राबविण्यात आलेल्या ‘चरण सेवा’ उपक्रमाच्या यशस्वीतेकरिता काम केलेल्या अधिकारी, सेवाभावी संस्था, कार्यकर्त्याचा तसेच आरोग्यवारी उपक्रमात उल्लेखनीय काम केलेल्या संस्थांचा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पंढरपूरचे उप विभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, गट विकास अधिकारी सुशील संसारे आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात ‘निर्मल दिंडी’, ‘चरणसेवा’ आणि ‘आरोग्यवारी’ उपक्रमाबाबत माहितीपट दाखविण्यात आले.