पंढरपूर, टीम —
अवघ्या काही दिवसांमध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार असून या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर पंढरपूर मध्ये मोठी राजकीय घटना घडत असल्याचे पहावयास मिळत आहे.

राज्याचे रोजगार हमी योजना,फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी आज विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला याप्रसंगी 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भगीरथ भालके यांनी मंत्री भरत गोगावले यांची भेट घेऊन सत्कार केला.या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले,माजी नगरसेवक किरण राज घाडगे,सुधीर धोत्रे,संजय बंदपट्टे यांच्यासह भालके समर्थक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील काही दिवसापूर्वी जिल्यातील काँग्रेसचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी एकनाथ शिंदे शिवसेना गटात प्रवेश केला असल्यामुळे आता भगीरथ भालके ही या गटात प्रवेश करतात की काय या चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. याप्रसंगी शिवसेना नेते महेश नाना साठे, सिद्धाराम म्हेत्रे,आमदार राजू खरे,यांच्यासह मोठ्या संख्येने एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या अनेक दिवसांपासून भगीरथ भालके हे काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे भालके यांचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचेही ऐकावयास मिळत आहे त्याच पार्श्वभूमीवर आजची ही भेट मोठी महत्त्वाची असल्याचे राजकीय क्षेत्रामध्ये सांगितले जात आहे.

कार्यकर्त्यांनी ठेवले स्टेटस….
विठ्ठल परिवाराचे नेते भगीरथ भालके यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मंत्री गोगावले यांची भेट घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी आता “लवकरच घोषणा” अशा प्रकारचे स्टेटस सोशल मीडियावर ठेवले असून या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे, यामुळे भगीरथ भालके आता पंजाची साथ सोडून धनुष्यबाण हाती घेणार असल्याचे पहावयास मिळणार आहे.
