पंढरपूर, टीम——-
गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर शहरांमध्ये दिवसाढवळ्या गावगुंडांनी हैदोस घातल्यामुळे शहरवासीय भयभीत झाले होते, याबाबत पोलीस प्रशासनावर ही मोठी नाराजी व्यक्त केली जात होती परंतु आता पोलिसांनी मैदानात येत कडक कारवाईचा धडाका सुरू केला असून गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात आलेल्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान अनेक सराईत गुन्हेगारांची धरपकड केली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र आता सुखावला असल्याचे दिसत आहे.

शहरामध्ये ज्या प्रमाणात भाविकांची संख्या वाढत आहे त्याच प्रमाणात पोलिसांची ही संख्या वाढणे गरजेचे आहे, अपुरे पोलीस बळ असल्यामुळे तारेवरची कसरत करत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी लागत आहे.

मध्यंतरी दिवसाढवळ्या काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी कोयत्याने वार केल्याच्या घटना घडल्या यामुळे पुन्हा एकदा शहरात टोळी युद्ध भडकते की काय? अशी शंका व्यक्त केली जात होती परंतु आता पोलीस प्रशासनाने नूतन सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बेकादेशीर कोयत्यासह फिरून दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांवर धडक कारवाई करून दहशत मोडून काढण्याकरता मोठ्या प्रमाणात धरपकड सत्र सुरू केले आहे. भविष्यात पंढरपूर शहर व परिसरातील सामान्य लोकांमध्ये कोणतीही दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्यास सदर गुन्हेगारांवर मोका,एम पी डी ए,तडीपार यासारखी कारवाई करून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांचा कायमचा बिमोड करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

इंस्टाग्राम youtube व सोशल मीडियावर गुन्हा, गुन्हेवारी बाबतचे व्हिडिओ अपलोड करून दहशत पसरवण्याचे प्रकार करू नये असे आवाहन केले आहे.
गणेशोत्स,नवरात्र उत्सव व इतर सर्व सण शांततामय व तणावपूर्ण वातावरणात पार पडावे यासाठी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन सुरू केले. या ऑपरेशन दरम्यान 2 पांढऱ्या रंगाच्या चार चाकी पिकप,5 मोटरसायकली तसेच 25 सराईत गुन्हेगार यांना जेरबंद करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके,यांच्या उपस्थितीमध्ये शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सपोनि आशिष कांबळे, सपोनी भारत वाघे,पोसई श्रीकांत घुगरकर, राजेश गोसावी, कल्याण ढवणे, पोना सचिन इंगळे, गोडसे,सचिन हेंबाडे प्रसाद औटी,विठ्ठल विभूते पोलीस कॉन्स्टेबल शहाजी मंडले,बजरंग बिचुकले व शहर वाहतूक शाखेचे अंमलदार व इतर कर्मचाऱ्यांनी एकत्र मिळून केली आहे.

या कारवाईमुळे तूर्तास तरी शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे मात्र सदरची कारवाई व कोंबिंग ऑपरेशन हे वारंवार राबवले जावे व ज्याप्रमाणे जुने काही अधिकारी वेशांतर करून जनसामान्यांमध्ये घुसून गुन्हेगारांना पायबंद घालत होते तशीच भूमिका ही सध्याच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मागणी आता पुढे येत आहे.
