पंढरपूर, टीम —-
सध्या पंढरपूर शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे,या अवैध धंद्यांचा कायमचा नायनाट करण्यासाठी सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी धाडसत्र सुरू केले आहे.

पंढरपूर शहरातील जुगार अड्ड्यावर सर्वात मोठी धाड टाकल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला असल्याचे पहावयास मिळत आहे कारण करकंब येथे एका जुगार अड्ड्यावर धाड टाकत 15 जुगारींना पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, सोमवार पेठ रोजा गल्ली येथील सिमेंट पत्र्याच्या शेडमध्ये शहाजी वसंत शिंदे व विजय बाबुराव वंजारी हे अवैधरित्या जुगार अड्डा चालवत होते याच जुगार अड्ड्याच्या जवळच्या खोलीमध्ये बेकायदेशीर रित्या देशी दारूही विकली जात होती.पोलिसांना याबाबतची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला.

सिमेंट पत्र्याच्या शेडमध्ये शहाजी वसंत शिंदे हा 14 जुगारींसोबत 52 पाणी पत्त्याच्या जुगारावर पैसे लावून जुगार खेळत असताना रंगेहात सापडला.तसेच विजय बाबुराव वंजारी हा पत्र्याच्या जवळच्या खोलीमध्ये बेकायदेशीर दारू विकत असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी या छाप्यामध्ये 14 मोबाईल, 7 मोटरसायकली, देशी दारू असा एकूण 6 लाख 23 हजार 622 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून करकंब पोलीस ठाण्यामध्ये 15 जणांवर महाराष्ट्र जुगार कलम कायदा चार व पाच प्रमाणे विजय बाबुराव वंजारी याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड, पोहे निलेश रोंगे, सातव, पोलीस कॉन्स्टेबल हुलजंती, लोंढे, कांबळे,अजित जाधव माने यांच्या पथकाने पार पडली आहे.या कारवाईमुळे करकंब भागातील अवैधरित्या दारू विक्री व इतर धंदे करणाऱ्या मंडळींचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहे.
