पंढरपूर, टीम—-
शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात मावा,गुटख्याची विक्री होत आहे या विक्रीवर पायबंध घालण्याचा प्रशासनाकडून अनेकदा प्रयत्न केला जातो परंतु हा प्रयत्न केवळ सपशेल दिखावा असल्याचे दिसून येत आहे कारण बंद झालेल्या टपऱ्या पुन्हा काही दिवसात जोमाने मोठ्या स्पीडने सुरू होत असतात.

गुटख्यावर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात पंढरीत खुल्या पद्धतीने गुटख्यासह माव्याची विक्री होत आहे.अक्षरशः मिनिटा मिनिटाच्या पावलावर मिळेल त्या ठिकाणी,मिळेल त्या जागेवर या टपऱ्या पडल्या असून टपऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात माव्यासह गुटख्याची विक्री होत असते.प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्या नंतर टपऱ्या बंद असतात परंतु टपऱ्यांच्या आड गोण्यामध्ये गुटका मावा घेऊन विक्री केली जाते.

या गुटख्या मावाचा विळखा शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांनाही पडला असल्यामुळे ते ही कधीकधी या रांगेत पहावयास मिळत असतात कधी तर शासकीय कार्यालयाची चार चाकी गाडी ही उभी करून गुटखा घेताना चे चित्र पंढरीत दिसत असते. याबाबत पोलीस प्रशासन व अन्न भेसळ विभाग यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याचे दिसत आहे कारण ठोस कारवाई नक्की कोण करणार याबाबत मतभेद असल्याचे दिसत आहे.

यामुळेच अवघे काही दिवस बंद असलेल्या टपऱ्या पुन्हा नव्या जोमाने नव्या ताकतीने सुरू होत असतात आणि या ठिकाणी पुन्हा मावा व गुटखा शौकीन मंडळींची रांग ही लागत असते या रांगेमुळे बाजारपेठ,उपनगर परिसरात तर अक्षरशः वाहतूक कोंडी होते परंतु तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष का करते हे मोठे गौडबंगालच राहत असून संतांची पंढरी नगरी 100%टक्के व कायमची गुटखा व मावा मुक्त कधी होणार हे स्पष्ट करणे मात्र अवघड आहे.
नूतन IPS अधिकारी डगळे यांच्या कडून मोठ्या अपेक्षा…..
अवैध वाळू उपस्या प्रमाणे पंढरीत अवैधरित्या होत असलेली गुटका विक्री ही एक मोठी समस्या बनत आहे या समस्येचा कायमचा बिमोड करायचा असेल तर आता नूतन सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी धडाकेबाज कारवाईचा धमाका करणे गरजेचे आहे आणि पंढरपूरकरांना त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा ही आहेत कारण बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पंढरपूर शहर व तालुक्याला खमका आयपीएस अधिकारी लाभला आहे.
