oplus_2097152
पंढरपूर, टीम——
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या असून पंढरपूरात भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनाकडून विविध विकासकामे आणि स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरू असतानाच विठ्ठल मंदिर परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मंदिर परिसरात रस्त्यावरच हातगाड्या आणि दुकाने थाटल्याने भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून मंदिर समितीच्या वाहनांनाही वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे.

विठ्ठल मंदिराच्या तुकाराम भवनासमोरील परिसर, तरटी दरवाजा तसेच नामदेव पायरीकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात परप्रांतीय विक्रेत्यांनी हातगाड्या व तात्पुरती दुकाने मांडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याशिवाय दुचाकी व चारचाकी वाहनेही रस्त्यावरच उभी केली जात असल्याने भाविक भक्तांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेली जागा अधिकच कमी होत आहे.

यामुळे तुकाराम भवन ते नामदेव पायरी या मार्गावर भाविकांची मोठी रेटारेटी होण्याची शक्यता निर्माण झाली असून दर्शनासाठी आलेल्या वृद्ध, महिला आणि लहान मुलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचवेळी स्वच्छता, कचरा संकलन किंवा इतर कामांसाठी येणारी मंदिर समितीची वाहनेही या गर्दीत अडकून पडत असल्याने वाहतूक व्यवस्थेवर ताण येत आहे.
दरवर्षी आषाढी यात्रेपूर्वी शहरातील अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमा राबवल्या जातात. मात्र मंदिर परिसरातील वाढत्या अतिक्रमणाकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याची भावना भाविक आणि स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिर परिसरात शिस्तबद्ध व्यवस्था असणे आवश्यक असताना सध्या मात्र वेगळे चित्र दिसून येत आहे.

आषाढी यात्रेला अवघे काही दिवस शिल्लक असताना मंदिर परिसरातील वाहतूक, अतिक्रमण आणि गर्दीचे नियोजन तातडीने करण्यात आले तर भाविकांना अधिक सुलभ आणि सुरक्षित दर्शनाचा लाभ मिळू शकणार आहे. अन्यथा यात्रेच्या मुख्य दिवसांत ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
