
पंढरपूर,टीम—–
दक्षिणकाशी पंढरी नगरीमध्ये आषाढी वारी ची लगबग सुरू झाली असून पालकमंत्र्यांनी रविवारी सर्वच विभागांचा आढावा घेत जोरदार बैठक घेऊन प्रशासनाला कामाला लावले आहे. मात्र पंढरी नगरी मध्ये काही प्रशासकीय विभाग सुस्त असल्याचे पहावयास मिळत आहे.कारण डीवायएसपी कार्यालयालगत एक धक्कादायक प्रकार घडला असून चक्क दिवसाढवळ्या एका दारुड्याने फुग्यातली दारू स्टिंग मध्ये मिक्स करत पॅक मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सोशल मीडियावर एका सामाजिक कार्यकर्त्याच्या फेसबुक पेजवर या दारुड्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. शहरामध्ये खुल्या पद्धतीने अवैध दारू विक्रीसह फुग्यामधील दारू मोठ्या प्रमाणात विकली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला असल्याचे सांगितले जात आहे. उपविभागीय पोलीस कार्यालया शेजारील रेल्वेच्या भिंतीच्या कट्ट्यावर बसून एक इसम फुग्यातील दारू सोबत स्टिंग पीत असल्याचे दिसून आला, यामुळे पंढरी नगरीमध्ये फुग्यातील दारू विक्री होत असल्याचे उघडकीस झाले आहे. वास्तविक पाहता रेल्वे ब्रिज खालून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते परंतु तरीही कुणाचेही लक्ष याकडे गेले नाही. शेजारी उपविभागीय पोलीस कार्यालय असतानाही हा धक्कादायक प्रकार घडत असल्याची लक्षात येतात सामाजिक कार्यकर्ते सचिन यादव यांनी सोशल मीडियावर याबाबत व्हिडिओ पोस्ट केला आणि पंढरीमध्ये असलेल्या अवैध दारू विक्रीचा पर्दाफाश केला.

वास्तविक पाहता फुग्यामधील दारू मुळे अनेकांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत परंतु तरीही पंढरी नगरीमध्ये फुग्यातील दारू विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. सदर मद्यपी हा सकाळी 10:30 वाजेच्या दरम्यान बिनधास्तपणे कुणाचाही धाक न ठेवता रेल्वेच्या भिंतीच्या कट्ट्यावर बसून प्लॅस्टिकच्या एका ग्लासमध्ये फुग्यातील दारू ओतून सोबत स्टिंग पीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे पंढरी नगरी मध्ये अवैध धंद्यांनी मोठ्या प्रमाणात डोके वर काढले असल्याचे दिसून येत आहे.
डीवायएसपी कार्यालया शेजारीच असा धक्कादायक प्रकार होत असेल तर पंढरीची सुरक्षा नक्की अबाधित आहे का? असा सवाल येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांकडून उपस्थित केला गेला,कारण सकाळी सकाळी बिंदासपणे फुग्यांच्या दारूवर हा मद्यपी स्टिंग सोबत ताव मारत बसला होता. यामुळे आषाढी यात्रेची लगबग सुरू झालेल्या पंढरी नगरीमध्ये पोलीस प्रशासन मैदानामध्ये येऊन अवैध दारू विक्रेत्यांचे कंबरडे मोडणार का हे पाहणे आता गरजेचे झाले आहे.
उत्पादन शुल्क विभाग सुस्त, अवैध धंदेवाले मस्त
पंढरपूर शहर व ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्रेत्यांचा सुळसुळाट सुरू असताना मात्र उत्पादन शुल्क विभाग उंटावरून शेळ्या राखत आहे, कारण या विभागाच्या सुस्त कारभारामुळेच भर गर्दीतल्या रस्त्यावर बसून दिवसा मद्यपी फुग्यातल्या दारूवर ताव मारताना पहावयास मिळत आहे.
