
पंढरपूर टीम —-
सध्या भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांना पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यांवर केवळ २ तास आणि इतर ठिकाणी ४ तास वीज दिली जात असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. उजनी धरणाची 100 री कडे दमदार वाटचाल सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे,परंतु वीज पुरवठा समाधानकारक नसल्यामुळे “पाणी उशाला कोरड घशाला” अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.यामुळे शेतीला किमान 8 तास वीज द्या अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

या मागणीची माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दखल घेत विजेअभावी शेतकऱ्यांचे नुकसान होणे ही अत्यंत गंभीर आहे, पंढरपूर तालुक्यातील शेती पंपांचा वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा याबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेन यांच्याशी फोनवरून चर्चा करून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले.याची तात्काळ दखल घेत “वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यात येईल”, असे स्पष्ट आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील बळीराजाच्या हक्कासाठी व शेतीच्या पाण्यासाठी आपला पाठपुरावा यापुढेही कायम असाच सुरू राहील असे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले.

शेतकरी संघटनाही आक्रमक ——
गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अपुरा व खंडित वीज पुरवठ्याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. पाणी उशाला उपलब्ध असतानाही मात्र महावितरण च्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे,यामुळे शेतकरी संघटनाही विजेच्या बाबतीत आक्रमक झाल्या असून त्यांच्याकडूनही आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
