सफाई कर्मचाऱ्यांची दिवसरात्र मेहनत;8 टिपर, 8 ट्रॅक्टर, 3 कॉम्पॅक्टर आणि 2 जेसीबीच्या साहाय्याने शहर स्वच्छ

पंढरपूर,टीम ——
यंदा प्रथमच आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात वीस लाखाहून अधिक भाविक दाखल झाले होते. शनिवारी पार पडलेल्या आषाढी एकादशी सोहळ्यानंतर लागलीच रविवारी पंढरपूर नगरपालिकेने शहरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवत अवघ्या एका दिवसात तब्बल १५० टन कचऱ्याची विल्हेवाट लावली आहे.लाखो भाविकांच्या आगमनानंतर शहरात साचलेला कचरा तातडीने हटविण्यासाठी पालिकेने मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तैनात केली आहे.

या मोहिमेत सुमारे एक हजार सफाई कर्मचारी दिवस रात्र कार्यरत असून आठ टिपर, आठ ट्रॅक्टर, तीन कॉम्पॅक्टर मशीन आणि दोन जेसीबी यांच्या साहाय्याने शहरातील प्रमुख रस्ते, मंदिर परिसर, दर्शनबारी, चंद्रभागा परिसर तसेच विविध सार्वजनिक ठिकाणांवरील कचरा उचलण्याचे काम सुरू आहे.

आषाढी यात्रेनंतर लगेच दुसऱ्या दिवशी तातडीने मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम हाती घेतल्यामुळे शहरातील प्रमुख मार्ग, चौक आणि मंदिर परिसरात स्वच्छतेचे समाधानकारक चित्र दिसून येत आहे. यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला ओला व सुका कचरा, प्लास्टिक, केळीच्या साली, अन्नाचा कचरा आणि इतर टाकाऊ वस्तूंची त्वरित विल्हेवाट लावण्यात आल्याने शहर पुन्हा स्वच्छ आणि सुस्थितीत आणण्यात यश येत आहे.

स्वच्छता मोहिमेअंतर्गत रस्ते झाडणे, कचरा संकलन करणे आणि सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. नगरपालिकेच्या या तातडीच्या कारवाईमुळे भाविकांसह स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यात्रेनंतर शहरात अस्वच्छता राहू नये आणि संसर्गजन्य आजारांचा धोका टाळण्यासाठी पालिकेने केलेल्या या व्यापक स्वच्छता मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले असून, अशीच तत्परता वर्षभर कायम ठेवावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.

आजी माजी नगरसेवकही आले मैदानात….
शहरामध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केल्यामुळे अनेक ठिकाणी अस्वच्छता निर्माण झाल्याचे दिसत असून उष्ट्या पत्रावळ्यांचे मोठमोठे ढिगारे लागले आहेत त्यामुळे स्थानिक आजी माजी नगरसेवक ही आता स्वच्छता अभियानासाठी मैदानात उतरले आहे.नगरसेवक ओंकार जोशी,माजी नगरसेवक किरण घाडगे यांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेत आपल्या प्रभागात स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात केली. मोठ्या प्रमाणात कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्यामध्ये दिवसभर हे नगरसेवक व्यस्त असल्याचे पहावयास मिळाले.

