
पंढरपूर शहर आणि २२ गावातील ३२ हजाराहून अधिक महिलांच्या उपस्थितीत रक्षाबंधन, हळदी कुंकू समारंभ संपन्न
पंढरपूर,टीम—–
आपण मला पोटनिवडणुकीत निवडून दिले आणि राज्यात आपले सरकार आले. त्यामुळे अल्पकाळात ३ हजार कोटींचा निधी मतदारसंघात आणला आहे. मी माता ,भगिनी, शेतकरी, युवकांच्या पाठीशी सरकार खंबीर उभा आहे. राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळायला हवा, ज्यांना लाभ मिळाला नाही, त्याच्यासाठी विशेष कॅम्प घेऊन सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करू, महिलांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करू, केंद्र आणि राज्य सरकार आणि आमदार म्हणून मी सुद्धा आपल्या पाठीशी आहे, अशी ग्वाही आ. समाधान आवताडे यांनी हजारो महिलांना दिली. कै महादेवराव आवताडे प्रतिष्ठान आयोजित हळदी कुंकू आणि रक्षाबंधन स्नेह मेळाव्यानिमित्त आलेल्या हजारो महिलांसोबत संवाद साधताना आ. आवताडे बोलत होते.
यावेळी मंगळवेढा बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, शेखर भोसले,अंजली आवताडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वर्षा शिंदे, विश्रांती भुसनर, शेखर भोसले, विनोद लटके, दत्तात्रय काळे, आदीसह हजारो महिला उपस्थित होत्या. यावेळी महिलांनी आ. आवताडे याना राखी बांधली. यावेळी आ. आवताडे यांच्या वतीने सर्व महिलांना स्नेह भोजन आणि ओवाळणी म्हणून साडी भेट देण्यात आली.
यावेळी पुढे बोलताना आ. आवताडे म्हणाले कि, मागील तीन वर्षे मला आपले प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. मात्र हा कालावधी खूप कमी होता. त्यात दीड वर्षे कोरोणा काळ होता, याशिवाय विधानसभेचे अधिवेशन, मंत्रालयातील कामे यासाठी वेळ गेला मात्र रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न आहे. आपण दिलेल्या संधीमुळे मतदार संघासाठी 3 हजार कोटींचा निधी आणण्यात मला यश आले. पंढरपूर शहर आणि तालुक्याचा विकासाचा जो बॅकलॉग आहे, तो भरून काढायचा आहे. मी जे बोलतो ते करतो आणि जे होणार आहे, तेच बोलतो, त्यामुळे मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ईसबावी सह उपनगरी भागात आजही रस्ते, ड्रेनेज, भाजी मंडई, पिण्याचे पाणी या प्रश्नावर खूप काम करावे लागणार आहे असे सांगितले.
३२ हजार भगिनिंचा सहभाग
पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर शहर आणि २२ गावातील महिलांसाठी १ सप्टेंबर आणि तीन सप्टेंबर या दोन दिवसात रक्षाबंधन आणि हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता. या दोन्ही दिवसांत ३२ हजार महिलांनी या सोहळ्यात सहभाग दर्शवला आणि आ. आवताडे यांच्या पाठीशी आपण उभा राहणार असल्याचे दाखवून दिले.
या सोहळ्यास उपस्थतीत हजारो महिलांच्या समक्ष सौ. अंजलीताई आवताडे यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आ. अवताडे यांनीहि केक भरवून सौ अंजलीताई आवताडे यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.वृषाली पाटील यांनी तर आभार भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुजाता वगरे यांनी मानले.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात जवळपास 3000 कोटी रुपयांचा विकास निधी आणून रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या आ. समाधान आवताडे यांनी रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने 32000 महिलांना माहेरचे वाण देऊन एक नवीन आगळावेगळा सामाजिक पराक्रम केला असल्याचेही पहावयास मिळाले आहे.