पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेत नवीन राजकीय समीकरणाचे संकेत
पंढरपूर,टीम—–
राज्यातील विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच विद्यमान आणि भावी आमदारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून मतदार संघात गाव भेट दौरे करून जनमत आजमावले जात आहे.कार्यकर्तेही आपल्या नेत्यांसाठी आतापासूनच जीवाचे रान करतांना दिसत आहे.सध्यातरी या मतदार संघात दुरंगी निवडणूक होणार नसल्याचे पहावयास मिळत आहे कारण दररोज नवनवीन चेहरे मैदानात येत आहेत.या मतदार संघात आता पंढरपूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले यांनी एन्ट्री केली असून शरद पवार गटाकडे त्यांनी उमेदवारीची मागणी केली आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघात सोलापूर विधान परिषदेचे माजी आ. प्रशांत परिचारक,भाजपाचे विद्यमान आ. समाधान आवताडे, युवक नेते भगीरथ भालके, मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असल्यामुळे मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागले असतानाच पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली.
या प्रसंगी माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले,राष्ट्रवादी काँग्रेसचे मा.शहराध्यक्ष सुधीर भोसले, संजय बाबर, धीरज डांगे, रहाटेवाडी येथील बजरंग पवार ,मा. सरपंच गिरीश पवार, सुनील मोहिते, अभय भोसले,पृथ्वीराज भोसले, श्रीराज भोसले, पिंटू भांगे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
नागेश काका भोसले हे पंढरपूर सह मंगळवेढा मतदारसंघात जननायक म्हणून परिचित आहेत.सर्वांच्या मदतीला धावून जाणारा आपल्या हक्काचा माणूस म्हणून त्यांच्या कडे पाहिले जाते.सर्व पक्षीय नेते व कार्य कार्यकर्त्यांसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत,यामुळे नागेश काकांच्या एन्ट्री मुळे सर्वांचीच पंचायत झाली आहे.लवकरच काका शरद पवार यांच्या गटात प्रवेश करून तुतारी हाती घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
