
पंढरपूर,टीम —–
गोरगरीब घरातील हुशार विद्यार्थ्यांना चांगले व उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी आरटीई अंतर्गत राज्य सरकार उच्च दर्जाच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देत असते परंतु आरटीई प्रवेशांमध्ये पंढरपूर तालुक्यात मोठा सावळा गोंधळ झाला असल्यामुळे व गरीब घरातील मुलांना प्रवेश नाकारल्यामुळे जवळपास 15 विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहत होते याबाबत आ.अभिजीत पाटील यांनी थेट शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क व पाठपुरावा केल्यानंतर त्या 15 विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल झाले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, आरटीई अंतर्गत पंढरपूर तालुक्यातील 15 विद्यार्थ्यांचे प्रवेश सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी येथे झाले होते परंतु सदर विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याचा निर्णय झाल्यामुळे याबाबत आ.अभिजीत पाटील यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासोबत पत्रव्यवहार करून सविस्तर चर्चा केली. 15 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाल्याने निष्पाप मुलांचे शैक्षणिक वर्ष व भविष्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.

गरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचे अधिकार व अधिकारावर गदा येणे ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या निदर्शनास आ. अभिजीत पाटील यांनी आणून देत,या सर्व विद्यार्थ्यांना त्वरित न्याय मिळावा त्यांचा शिक्षणाचा मूलभूत हक्क हिरावून घेतला जाऊ नये अशी आग्रही भूमिका ही आ. अभिजीत पाटील यांनी मांडली. तेव्हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या या संवेदनशील विषयाची शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गांभीर्याने व तात्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधत सदर विद्यार्थ्यांचे आरटीई प्रवेश रद्द करू नये तसेच या प्रकरणाची योग्य चौकशी करावी असे कठोर निर्देश दिले आहे, यामुळे 15 चिमुकल्यांचा शिक्षणाचा हक्क अबाधित राहिला असून त्यांचे भविष्य आता उज्वल होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न हा राजकारणाचा नाही तर उज्वल भवितव्याचा आहे. माढा मतदारसंघच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील सर्वसामान्य गोर गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या योग्य न्याय मिळवून देण्यासाठी इथून पुढेही कायमच माझा पाठपुरावा सुरू राहील.
—आ.अभिजीत पाटील
