पंढरपूर, टीम—-
नाताळ सण व सलग सुट्ट्यांमुळे पंढरी नगरीमध्ये सध्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पहावयास मिळत आहे परंतु या भाविकांना शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसत आहे.शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये काही अवजड वाहने प्रवेश करत असल्यामुळे भाविकांमधून मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.देवभूमी पंढरी नगरीला पुरेसे पोलीस बळ नसल्यामुळे भाविकांना वारंवार वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, चौफाळा व गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे सध्या कासेगाव बायपास रस्त्याचे काम चालू असल्यामुळे त्या रस्त्यावरून अवजड वाहने संथ गतीने सोडली जात आहेत त्यातील काही वाहने नजर चुकून शहरांमध्ये खुले आम पणे एन्ट्री करून शहरातून जात असल्याचे प्रकार वारंवार घडत आहे गजानन महाराज मठ मंदिर परिसरात शुक्रवारी अशीच काही अवजड वाहने घुसल्याचे दिसून आले.

शहराचे वाढते संख्याबळ व शहरांमध्ये येणाऱ्या भाविकांच्या संख्येच्या मानाने पंढरीत पोलीस बळ अपुरे असल्याचे सांगितले जात आहे. शहराला पुरेसे पोलीस बळ द्या अशी मागणी वारंवार होत असतानाही प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून याबाबत टाळाटाळ केली जात आहे त्यामुळे आहे त्या पोलीस बळाचा वापर करून प्रशासनाला शहरातील रस्ते वाहतूक कोंडीतून दूर करावे लागत आहे परंतु यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहे.कारण सध्या छत्रपती शिवाजी महाराज चौक चौफाळा व विशेषता गजानन महाराज मठ परिसरामध्ये सायंकाळी पाच नंतर मोठी वाहतूक कोंडी होत आहे या वाहतूक कोंडीतून वाहने बाहेर काढताना परगाहून आलेल्या वाहनधारकांना मात्र मोठी कसरत करावी लागत आहे अनेक प्रयत्न करूनही वाहने बाहेर निघत नसल्यामुळे हीच का भूवैकुंठ पंढरी नगरी असा सवाल भाविकांकडून उपस्थित होत आहे.

कासेगाव बायपास रस्त्याचे काम बंद असल्यामुळे येथील काही वाहने शहरांमध्ये घुसत आहेत या वाहनांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळेच ही वाहने शहरांमधून प्रवास करत असतात या वाहनांच्या गर्दीमध्ये कधी तरी ऊस वाहतूक करणारी ही काही वाहने घुसत असल्यामुळे पंढरी नगरीमध्ये वाहतूक कोंडीचे तीन तेरा नऊ अठरा झाल्याचे पहावयास मिळत असते.

नाताळ व शालेय सुट्ट्यांच्या निमित्ताने पंढरी नगरी मध्ये येणारे भाविकांच्या गर्दीच्या मानाने वाहतूक नियोजन होणे गरजेचे असतानाही मात्र पोलीस प्रशासन नेमके काय करते याबाबत सवाल उपस्थित होत आहे कारण सध्या मंदिर परिसरातील असा एकही रस्ता नाही की ज्या रस्त्यावर वाहतूक कोंडी नाही सध्या यामध्ये सर्वात जास्त वाहतूक कोंडीचा रस्ता म्हणून गजानन महाराज मठ परिसरातील रस्ता ओळखला जात आहे.
