पंढरपूर,टीम——
महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी काही महिन्यावर आल्या असताना सरकारच्या वतीने शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरू झाला आहे. याचाच एक भाग म्हणून पंढरपूर तहसील विभाग व विठ्ठल मंदिरातील अधिकाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली आहे, या मध्ये काहींना लांब तर काहींना अगदी जवळचा पल्ला मिळाला असल्याचे पहावयास मिळत आहे.

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनीयमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबनास प्रतिबंध अधिनियम 2005 चा संदर्भ अन्वये 31 जुलै रोजी बदल्यांचा शासन आदेश निघाला असून गेल्या काही वर्षांपासून विठ्ठल मंदिरामध्ये व्यवस्थापक म्हणून काम पाहणारे बालाजी पुदलवाड यांची बदली माढा येथे झाली असून तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार पंडित कोळी यांची जत सांगली येथे तर याच कार्यालयातील मनोज बाळकृष्ण श्रोत्री यांची बदली विठ्ठल मंदिर समिती व्यवस्थापक पदावर झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तहसील कार्यालयातील बहुतांश अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रलंबित होत्या परंतु विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे शासनाच्या वतीने अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे सत्र सुरू झाले आहे.


विठ्ठल मंदिरामध्ये व्यवस्थापक म्हणून काम करणारे बालाजी पुदलवाड यांनी आपल्या कार्यकाळामध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय राबवून भाविक व कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक बदल केले आहेत. मंदिराच्या संवर्धनाचे सर्वात मोठे काम पुदलवाड यांच्याच कार्यकाळात सुरू झाले आहे, त्यांनी आपल्या अनुभवाचा मोठा फायदा भाविकांना करून दिल्यामुळे त्यांच्या कार्यकाळात सर्वच यात्रा सुरळीत व सुखरूप पार पडल्या आहेत.

आता विठ्ठल मंदिर समितीला नव्याने व्यवस्थापन म्हणून मिळालेले मनोज श्रोत्री यांनाही प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव आहे. पंढरपूर तहसील येथे नायब तहसीलदार म्हणून सेवा करतांना त्यांनी अनेक प्रलंबित कामांचा निपटारा केला असून येथील कामकाजात सुसूत्रता व पारदर्शकता आणल्यामुळे सर्वसामान्य नागरिक येथे सुखावला होता. त्यांच्या याच अनुभवाचा फायदा नक्कीच विठ्ठल मंदिर समितीला होऊन भाविकांच्या दर्शनामध्ये पारदर्शकता व सुरळीतपणा येणार असल्याचेही पहावयास मिळणार आहे.
