oplus_140509184
पंढरपूर, टीम —-
मागील वर्षाच्या आषाढी एकादशी दरम्यान पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये डिजिटल नावांमध्ये संतांचे अभंग लावून सदर चौक आकर्षित करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु हा प्रयत्न सपशेल फेल झाला असल्याचे पहावयास मिळत आहे. कारण नगरपरिषदेने लावलेले डिजिटल अक्षरे, फलक,बोर्ड वर्ष होण्याच्या आतच झिजून पडले असून एका कोपऱ्यातील विठ्ठलही फिरायचा थांबला आहे यामुळे हा लाखोंचा खर्च नेमका कुणासाठी हा सवाल मात्र उपस्थित होत आहे.

आषाढी यात्रा सोहळा निमित्त पंढरी नगरीमध्ये आलेल्या भाविक भक्तांना सोयी सुविधा देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करोडो रुपयांचा निधी खर्च केला जातो परंतु हा निधी म्हणजे केवळ अधिकाऱ्यांची मौजमजा व प्रशासनाचे चांगभले होत असल्याचे पहावयास मिळत असते,कारण यात्रा काळात केलेल्या कामांचा यात्रे नंतर अवघ्या काही दिवसातच बोलवारा उडत असतो.

मागील वर्षी पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये डिजिटल अक्षरांमधील संतांचे अभंग व काही मुर्त्या बसवण्यात आल्या परंतु या सर्व कामांचा मोठा बोजवारा उडाला आहे. प्रबोधनकार ठाकरे चौक नवीन कराड नाका येथे मोठ मोठ्या डिजिटल अक्षरांमध्ये “देह विठ्ठल विठ्ठल झाला…. नाम घोषात देह हा न्हाला” या अभंगाच्या ओव्या लावण्यात आल्या होत्या परंतु अवघ्या काही दिवसातच यातील काही डिजिटल ओव्या जमीन दोस्त झाल्या. याच ओव्यांच्या शेजारी भले मोठे तारेचे फुलासारखे डिझाईन करून त्यावर पांडुरंगाची प्रतिकृती बसविण्यात आली होती. सुरुवातीला काही दिवस ही प्रतिकृती चारी बाजूला गोल-गोल फिरली परंतु त्यानंतर सदर पांडुरंगाची मूर्ती ही फिरण्याचे बंद झाले, याबाबत स्थानिक माजी नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्यानंतर नगरपरिषदेला खडबडून जाग आली आणि पुन्हा विठ्ठल जोमाने फिरू लागला परंतु तोही नेहमीप्रमाणे काही दिवसच. यामुळे लाखो रुपयांचा खर्च नेमका कोणासाठी होतो असा सवाल सर्वसामान्य पंढरपूरकर मधून उपस्थित होत आहे.

बोगस कामांचा ठपका ठेकेदाराची माणसे जर पंढरपूरकरांवर ठेवत असतील तर मात्र यात काहीतरी नक्कीच गौडबंगाल आहे असा संशय व्यक्त होत आहे.

