
पंढरपूर,टीम——-
शहरामध्ये सध्या महत्त्वाच्या गर्दीच्या रस्त्यांवर मोकाट जनावरांचा बिनधास्त वावर असल्याचे पहावयास मिळत आहे ही मोकाट जनावरे सध्या वाहतूक पोलिसांना जणू काही विशिष्ट वाहतुकीला शिस्त लावण्याचे सहकार्य करून रस्ता अडवत आहेत मात्र याचा मनस्ताप हा सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत असल्याचे चित्र गेल्या अनेक दिवसांपासून शहरांमध्ये पाहावयास मिळत आहे याबाबत प्रशासन या जनावरांचा बंदोबस्त करणार का? व ही जनावरे अजून किती दिवस वाहतुकीला शिस्त लावतात हे पाहणे महत्त्वाचे झाले आहे.
आषाढी यात्रा कालावधीमध्ये शहरातील मोकाट जनावरे पकडून त्यांना बाहेर सोडण्याचे टेंडर काढले जाते परंतु यामध्ये मोठा गोलमाल होत असल्याचे सध्या स्पष्ट होत आहे कारण गेल्या काही दिवसांपासून शहरातील इसबाबी येथील विसावा तसेच पंचायत समिती तहसील कार्यालय या परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा वावर दिसून येत आहे ही जनावरे घोळक्याने रस्त्याच्या मधोमध उभे राहत असल्यामुळे जणू काही ही जनावरे बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावत असल्याचे दिसत आहे कारण जनावरांच्या घोळका रस्त्याच्या मधोमध थांबल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावत असून सुपरफास्ट पणे वाहन चालवणारे ही संथ गतीने वाहने चालवत असतात, यामुळे या जनावरांना वाहतुकीला शिस्त लावण्याचा ठेका दिलाय की काय अशीही शंका उपस्थित होत आहे.
सदर मोकाट जनावरे ही वजनाने,ताकतीने व तब्येतीने भली मोठी असल्यामुळे त्यांना रस्त्यावरून बाजूला काढण्याचे धाडस सहजा सहजी कोणाचे होत नाही. या जनावरांना त्रास न देता त्यांच्या शेजारून हळूच वाहने काढून घेण्यामध्येच नागरिक पसंती दाखवत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावर हा प्रकार सुरू आहे याच रस्त्यावरून अनेकदा पोलीस,महसूल व पंढरपूर नगरपरिषद प्रशासनातील अधिकारी कर्मचारी ये जा करीत असतात परंतु त्यांचेही धाडस या मोकाट जणांना रस्त्यावरून बाजूला करण्याचे होताना दिसत नसल्यामुळेच पंढरपूरमध्ये मोकाट जनावरांनी हैदोस घातला आहे. याचा नाहक त्रास मात्र सर्वसामान्य प्रवाशांना भोगावे लागत आहेत. या जनावरांमुळे एखादा मोठा अपघात व दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असाही सवाल आता उपस्थित होत आहे.