वारकरी हाच व्हीआयपी मानून प्रशासनाने घडवले दर्शन
पंढरपूर, टीम——
आषाढी यात्रा सोहळ्याच्या निमित्ताने पंढरी नगरीमध्ये लाखो भाविकांची गर्दी झाली आहे या गर्दीमध्ये मोठ्या प्रमाणात वयोवृद्ध भाविक असतात. विठुरायाच्या दर्शनासाठी तासंतास लागत असतात त्यामुळे वयोवृद्ध भाविकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असतो.दर्शन रांगेतील सामान्य भाविकांना सुलभ दर्शन व्हावे. यासाठी व्हीआयपी दर्शन बंद आहे. मात्र वारकरी हाच व्हीआयपी मानून सध्या प्रशासन काम करतय. यामध्येच पंढरपूरच्या दर्शन रांगेत दोन वयोवृद्ध भाविक उभे होते. शारीरिक क्षमता सांभाळत हे भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभे असताना दिसले. यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी या भक्तांना दर्शन रांगेतून सोबत घेत विठ्ठलाचे थेट दर्शन घडवले असल्यामुळे विठ्ठल भक्तांमध्ये जिल्हाधिकारी रियल हिरो ठरले असून आजवर जे इतर कुणालाही जमले नाही ते थेट जिल्हाधिकाऱ्यांनी करून दाखवले आहे.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद केल्यामुळे सामान्य भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळते. यावेळी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपुरात वारकरी हाच व्हीआयपी आहे. असे सांगत वारकऱ्यांच्या दर्शनाची व्यवस्था प्रशासन करत असल्याचे सांगितले. याच हेतूने दर्शन रांगेत शारीरिक क्षमता सांभाळत असणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांना आज थेट विठ्ठलाचे दर्शन घडवत. वारकरी हाच व्हीआयपी . याची प्रचिती सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून करून देण्यात आली.

विठ्ठलाची दर्शन रांग सध्या गोपाळपूर रोडवरील पत्रा शेड पर्यंत आहे. त्यामुळे विठ्ठल भक्ती तल्लीन होऊन प्रत्येक वारकरी भक्त दर्शन रांगेत उभा राहून विठ्ठलाचे दर्शन घेतो. मात्र हेच दर्शन घेत असताना वयोवृद्ध नागरिकांचा त्रास पाहून. जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी पुढाकार घेत मंदिरे समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज आणि कार्यकारी अधिकारी शेळके यांच्या माध्यमातून वयोवृद्ध भाविकांना थेट दर्शन दिल्यामुळे संबंधित वारकरी भक्ता मधून समाधान व्यक्त केले गेले.

दर्शन रांग व दर्शन व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी मंदिर समितीचे पदाधिकारी वारंवार दर्शन बारीला भेट देत आहेत मात्र याप्रसंगी त्यांना कुणालाही वयोवृद्ध भाविक दिसला नाही आणि त्यांनी या भाविकांना थेट विठ्ठलाचे दर्शन करून देण्याचा प्रयत्नही केला नाही त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना जे जमले ते इतरांना का आजवर का जमले नाही असा सवाल मात्र उपस्थित होत आहे.

