पंढरपूर,टीम —-
पंढरीत आषाढी वारी सोहळ्यासाठी सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असताना शहराला विकासकामांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देण्याची मागणी नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके यांनी केली होती तेव्हा तात्काळ या मागणीची दखल घेत अवघ्या काही मिनिटात शासकीय अध्यादेश काढून पंढरपूर नगरपरिषदेला 5 कोटी निधी मंजूर केला होता.आता पुन्हा नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके यांची दुसरी मोठी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केल्यामुळे शिंदे यांच्या दरबारी डॉ. प्रणिता भालके यांचे मोठे वजन वाढले असल्याचे पहावयास मिळत आहे.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक व सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी नगराध्यक्षा डॉ.प्रणिता भालके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीस अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.

या रुग्णवाहिकेचे लोकार्पण राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनिनाथ औसेकर, मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे, प्रशासकीय अधिकारी राजेंद्र शेळके, पंढरपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, डॉ काळे, शिवसेनेचे नाना मोरे, नाना निंबाळकर, गोविंद पवार, सुधीर घोडके, डॉ. संतोष यादव, नवनाथ लोखंडे यांचेसह विविध मान्यवर उपस्थित होते.
पंढरपूरमध्ये आषाढी, कार्तिकी आणि इतर उत्सवांच्या काळात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. अशा वेळी आपत्कालीन वैद्यकीय सेवा तातडीने उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असते. नव्याने उपलब्ध झालेल्या या अत्याधुनिक रुग्णवाहिकेमुळे आपत्कालीन परिस्थितीत भाविकांना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात हलविणे अधिक सुलभ होणार असून मंदिर परिसरातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार आहे असल्याची माहिती नगराध्यक्षा डॉ.भालके यांनी दिली.

या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल नगराध्यक्षा डॉ.प्रणिता भालके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर, मंत्री भरत गोगावले यांचे मनःपूर्वक आभार मानले.
