
पंढरपूर,टीम ——
आषाढी यात्रा सोहळ्यातील दिंडी व पालख्यांनी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील बहुतांश सर्वच गावांमध्ये भाविक भक्त,दिंड्या,पालख्या मुक्कामी राहत असतात. पालखी मार्गावरील गावांना शासनाचे वतीने अनुदान मिळते परंतु इतरही ज्या ज्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक भक्त राहत असतात त्या सर्व गावांना मात्र पदरमोड करून दरवर्षी भाविकांची सेवा करावीत लागत असते त्यामुळे याही गावांना भाविकांना चांगल्या प्रकारे सोयी सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाने अनुदान द्यावे अशी मागणी सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्र राज्यातून विविध संतांच्या पालख्या पंढरी नगरीत येत असतात.पालखी मार्गावर तोंडले, बोंडले, दसुर, केसकरवाडी, भाळवणी,पिराची कुरोली, वाडीकुरोली, धोंडेवाडी, उपरी, भंडीशेगांव, शेळवे, खेडभाळवणी, वाखरी, गादेगांव या ग्रामपंचायती आहेत. या गावात श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज, जगदगुरु श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचा विसावा असतो व लहान मोठे अनेक विविध संतांच्या पालख्या गावात मुक्कामी असतात.
सदर ग्रामपंयाती यांना वारकरी भक्तांना सोयी सुविध पुरविण्यासाठी ग्रामपंचायतीला मिळणारा राज्य शासनाचा निधी अपुरा पडत असल्याने वारकरी भाविक भक्तांची गैरसोय निर्माण होत असते. वारकरी भाविकांना चांगल्या प्रकारे सोयी सुविधा पुरविण्यासाठी सदर ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी मंजुर होणे गरजेचे आहे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचेकडे काळे यांनी केली आहे.
या मागणीमुळे पालखी मार्गाव्यतिरिक्त असणाऱ्या इतर गावांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण भाविक भक्तांच्या सोयीसाठी दरवर्षी मोठी पदर मोड करावी लागत आहे आणि ही पदरमोड करताना मात्र चांगलीच तारेवरची कसरतही होत असते.