वारीच्या अनुषंगाने तक्रारी निवारणासाठी एकात्मिक नियंत्रण कक्ष कार्यान्वित

पंढरपूर, टीम —–
आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पंढरीत आलेल्या भावीक भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागू नये, सर्व चोख व्यवस्था मिळावी यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी एस कार्तिकेन यांच्याकडून काटेकोरपणे नियोजन केले जात आहे.त्याचाच एक भाग म्हणून आता प्रशासनाच्या वतीने 6 फोन नंबर प्रसिद्ध करण्यात आले असून या ठिकाणी भाविक भक्तांनी फोन लावल्यास त्यांना त्वरित मदत व सहकार्य मिळणार असून अडचण तात्काळ सोडवली जाणार आहे.

शहरात दिनांक १५ जुलै ते २९ जुलै २०२६ दरम्यान संपन्न होणाऱ्या आषाढी वारी सोहळ्यासाठी लाखो भाविक, वारकरी व दिंड्या दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी जुने बसस्थानक येथे Integrated Control Room (एकात्मिक नियंत्रण कक्ष) स्थापन करण्यात आला आहे.

वारीच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर निर्माण होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एकात्मिक नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. विविध विभागांच्या अडचणी निर्माण झाल्यास त्या अडचणींचे समन्वयाने निराकरण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसाठी स्वतंत्र भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

यामध्ये रस्ता, वीज, स्वच्छता, पाणीपुरवठा, पोलीस प्रशासन आदी विभागांशी संबंधित अडचणी निर्माण झाल्यास संबंधित प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले असून या सर्व यंत्रणेवर प्रांत सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगोटे यांच्या वतीने लक्ष ठेवण्यात येत आहे.
संपर्क क्रमांक: 9403409908, 9403409930, 9403409936, 9403409952, 9403409961, 9403409962
वारी कालावधीत भाविकांना तसेच प्रशासकीय यंत्रणेला कोणत्याही अडचणींचे जलद निराकरण व्हावे व सर्व विभागांमध्ये समन्वय राहावा, यासाठी या एकात्मिक नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.
