कासेगाव हद्दीत ५४ एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित
पंढरपूर,टीम——
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक निधी आणण्याचे काम आ.समाधान आवताडे यांनी केले आहे.कोट्यावधी रुपयांचा निधी त्यांनी आणून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात जणू काही विकासाची गंगाच आणली आहे. आता आमदार समाधान आवताडे यांनी सुशिक्षित तरुणाईचे सर्वात मोठे समाधान केले आहे, कारण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात एमआयडीसी मंजूर झाली आहे यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकी अगोदर आ. आवताडे यांचे पारडे जड झाल्याचे पहावयास मिळत आहे.
पंढरपूर औद्योगिक वसाहतीसाठी कासेगाव हद्दीतील ५४ एकर जमीन उद्योग मंत्रालयाने ‘औद्योगिक क्षेत्र ‘ म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे पंढरपूर एम आय डी सीच्या उभारणीला आता गती येणार आहे. लवकरच midc चे भूमिपूजन होणार आहे.
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते, चार प्रमुख वाऱ्या वर उदरनिर्वाह करणारे गाव अशीही पंढरपूरची ओळख आहे. पंढरपूर तालुक्यातील हजारो युवक रोजगाराच्या शोधत पुण्या – मुंबईला जातात. स्थानिक पातळीवर एम आय डी सी असावी अशी मागणी अनेक दशकांपासून केली जात आहे. मात्र आजवर राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी एम आय डी सी मंजूर झाली नाही. बऱ्याच वेळी स्थानिक राजकारणाच्या कुरघोडी मुळे एम आय डी सी उभारणीत खोडा घातला जात होता. परंतु आ. समाधान आवताडे यांनी गेल्या केवळ दोन वर्षात सातत्याने पाठपुरावा करून, कासेगाव हद्दीत एम आय डी सी मंजूर करून घेतली. आणि आज ( दि. २१ ऑगस्ट) पासून कासेगाव हद्दीतील गट नंबर १९४७/४,
१९४७/६, १९४७/ ८ मधील हे क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून उद्योग मंत्रालयाने जाहीर केले आहे. त्यामुळे लवकरच पंढरपूर एम आय डी सी उभारणीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. येथील औद्योगिक वसाहतीच्या उभरणीतील महत्वाचा टप्पा पार झाला आहे. आ. समाधान आवताडे यांनी मागील दोन वर्षांपासून यासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा केला आहे.

कासेगाव हद्दीतील जागेचा प्रस्ताव औद्योगिक विकास महामंडळास पाठवला होता.औद्योगिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कासेगाव येथे येऊन जागेची पाहणी केली होती. त्यानंतर आ. आवताडे यांनी उद्योग मंत्रालय, औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडे सतत पाठपुरावा चालू ठेवला होता.
उद्योग मंत्रालयाकडून राज्यपालांच्या आदेशानुसार ५४ एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. आ. आवताडे यांनी उद्योग मंत्रालयाचे सहसचिव संजय देगावकर यांच्याकडून हा अध्यादेश स्वीकारला आहे. त्यानंतर आ.आवताडे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचेही आभार मानले आहेत.

पंढरपूर येथील एम आय डी सी. च्या उभरणीतील कासेगाव हद्दीतील जागा निश्चित केल्यामुळे पंढरपूर शहर व तालुक्यातील हजारो बेरोजगार युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळण्यासाठी मदत होणार आहे. शिवाय तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या औद्योगिक विकासाला ही चालना मिळणार असून दक्षिण काशीला ही “अच्छे दिन” येणार आहेत.
एमआयडीसी मंजूर झाली पण पुढे काय?
कासेगाव हद्दीत एमआयडीसी मंजूर झाली आहे, या एमआयडीसीसाठी इतरही नेत्यांनी आप-आपल्या परीने प्रयत्नांची परराष्ट्र लावली. काही का असेना पण एमआयडीसी मंजूर होऊन पंढरी नगरीला चांगले दिवस येणार आहेत, परंतु मंजूर झालेल्या एमआयडीसी वरून राजकारण होऊ नये एवढीच अपेक्षा सर्वसामान्य पंढरपूरकर व्यक्त करत आहेत. जर राजकारण सुरू झाले तर मात्र मंजूर एमआयडीसी ही कधी होणार याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
