
पंढरपूर, टीम——
दक्षिण काशी पंढरी नगरीमध्ये दिवसेंदिवस भाविकांच्या संख्येत वाढ होत जात असतानाही पोलीस प्रशासन मात्र बेफिकर राहत असल्याचे पहावयास मिळत आहे कारण पंढरी नगरीमध्ये कोयता गँग ची दहशत पुन्हा वाढीस लागल्याचे दिसत आहे आज पंढरपूर मधून एक धक्कादायक घटना घडली असून भर दिवसा एका 17 वर्षे तरुणावर भर चौकात कोयत्याने वार करण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले असून गणपती मंडळाच्या बैठकांमध्ये व्यस्त असणारे पोलीस प्रशासन व अधिकारी रस्त्यावर उतरून गाव गुंडांचा बंदोबस्त कधी करणार याकडे शहर वासियांच्या नजरा लागल्या आहेत.

संत गजानन महाराज मठासमोर एका तरुणावर चार ते पाच तरुणांनी कोयत्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी दुपारी संत गजानन महाराज मठासमोर घडली.अज्ञात कारणावरून 4 ते 5 तरुणांनी श्रेयस धर्मा पवार वय 17 या तरुणावर धारदार कोयत्यांनी वार केले आहेत.या हल्ल्यामध्ये श्रेयश पवार हा सतरा वर्षीय तरुण गंभीर जखमी झालेला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पंढरपूरमध्ये सोशल मीडियावर उघडपणे गुंडगिरीचे स्टेटस तसेच व्हिडिओ व्हायरल होत आहेत… आणि या मधूनच पुन्हा एकदा पंढरपूर मध्ये टोळी युद्ध भडकते की काय अशी भीती सध्या पंढरपूर मधील नागरिकांना वाटू लागली असून त्यातूनच हा हल्ला झाला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

गणेश उत्सव सण जवळ आल्यामुळे पोलीस अधिकारी व प्रशासन गणेश मंडळांच्या बैठका घेऊन कायदा सुव्यवस्था राखण्याचे आव्हान करत असताना ज्या दिवशी बैठक सुरू होती नेमके त्याच वेळेस हा हल्ला झाला आहे, विशेष म्हणजे काळा मारुती चौक पोलीस चौकी ही हल्ला झालेल्या घटने पासून हाकेच्या अंतरावर आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधींनी घ्यावी दमदार भूमिका…….
छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये डॉल्बीच्या आवाजाने दहीहंडी उत्सव दरम्यान एका नागरिकांचा अंत झाला. शहरांमध्ये गावगुंडांची टोळी सक्रिय झाली आहे. अवैध वाळू उपसा नित्यनेमाने सुरू आहे. अवैध गुटखा ही मोठ्या प्रमाणात सापडला जात असताना स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र याबाबत कडक ठोस भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली,कारण गावगुंड व अवैध धंदेवाल्यांवर कोणाचाही वचक नसल्यामुळे शहर व शहरवासीय भयभीत झाले आहेत.

