पुरामुळे बाधित शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी – कल्याणराव काळे

पंढरपूर, टीम——
उजनी आणि वीर धरणांमधून सोडण्यात येत असणाऱ्या पाण्यामुळे भीमा नदीला पूर आल्याने पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांचे केळी, ऊस व इतर फळ शेती पिकांचे नुकसानीचे पंचनामे करुन त्यानां मदत मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य,सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी महसुल विभागाकडे केली असून याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, एकनाथजी शिंदे यांच्याकडे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे काळे यांनी सांगितले आहे, यामुळे पूर बाधित शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

पुराने बाधित झालेल्या पिराची कुरोली , वाडीकुरोली, शेळवे, खेडभोसे, खेडभाळवणी, होळे, देवडे, पटकुरोली, शिरढोण या गावात भेटी देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली, यावेळी कृषीराज शुगरचे चेअरमन गणेश पाटील, सहकार शिरोमणीचे संचालक मोहन नागटिळक, परमेश्वर लामकाने, अरुण भोई, बिभीषण पवार, विश्वास उपासे, समाधान उपासे, यशवंतराव चव्हाण पतसंस्थंचे चेअरमन शहाजी साळूंखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल नागटिळक, उत्तम नाईकनवरे, पिराची कुरोलीचे सरपंच तुकाराम माने, देवडेचे सरपंच सोमनाथ झांबरे, खेडभोसेचे सरपंच संजय देवळे, बंडू पवार यांच्या सह बाधित शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

उजनी आणि वीर धरणांमधून सोडण्यात येत असणाऱ्या पाण्यामुळे भीमा नदीला पूर आलेला आहे यामुळे नदीकाठच्या गावात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिक, त्याचबरोबर फळबागा पाण्यात गेल्याने फार मोठे नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर पिराची कुरोली गावातील भुई वस्ती येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. महसूल विभागाने नदीकाठच्या गावातील पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यास संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही काळे यांनी सांगितले आहे.
