
पंढरपूर,टीम—–
शालेय शिक्षण घेत घेत येथील रहिवासी असलेल्या 16 वर्षीय सहिष्णू जाधव याने सलग दुसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा भीम पराक्रम केला असल्यामुळे पंढरीच्या शिरपेचात आणखी एक सर्वात मोठा मानाचा तुरा रोवला गेला असून दक्षिण काशी पंढरीचा डंका साता समुद्रापार वाजला आहे.
एका बाजूला शालेय परिक्षा आणि दुसऱ्या बाजूला पोहण्याची आवड यातून सहिष्णू जाधव याने दुसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा भीम पराक्रम केला आहे. बऱ्याच जणांसाठी इंग्लिश खाडीचा विजय हा एकदाच साध्य होतो, पण सलग दुसऱ्या वर्षी पोहून खाडी पार करणारा सहिष्णू याला अपवाद ठरला आहे. या धाडसी जलतरणपटूने दुसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा पराक्रम पहिल्यापेक्षा कमी वेळात करून दाखवला आहे.
मागील वर्षी, सहिष्णूने सहा व्यक्तींच्या टीमसोबत 16 तासांच्या संघर्षानंतर इंग्लिश खाडी पार केली होती. यावर्षी त्याने तीन जणांच्या टीमसोबत मागच्या वर्षीपेक्षा कमी वेळेत म्हणजे 15 तास 8 मिनिटांत हे अंतर पार केले आहे. सहिष्णू हा दोन वेळाइंग्लिश खाडी पार करणारा सर्वात तरुण भारतीय असून आजवरच्या इतिहासात केवळ 65 भारतीयांनी इंग्लिश खाडी पोहत पार केली आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीने भारतीयांची मान उंचावली आहे. त्याचबरोबर असंख्य तरुण खेळाडूंना प्रेरणा देखील दिली आहे. सहिष्णूच्या या पराक्रमाची दाखल इंग्लिश माध्यमांनीही घेतली असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. समुद्र मला मागे खेचत होता तर मी स्वतःला पुढे ढकलत होतो असल्याचा अनुभव सहिष्णू याने सांगितला आहे.
जलतरण इतिहासातील प्रवास
सहिष्णूचा जलतरणातील प्रवास मागील वर्षी म्हणजे त्याच्या वयाच्या 15व्या वर्षी सुरु झाला. इंग्लिश खाडी, वाहते प्रवाह आणि अनिश्चित हवामान हे त्याच्या प्रसिद्ध वैशिष्ट्यांपैकी आहेत, जलतरणपटूंसाठी ही एक आव्हानात्मक परिक्षा असते.
शेवटच्या 2 तासात थरारक अनुभव —–
29 जुलैच्या जलतरणात खूप आव्हाने होती. शेवटच्या दोन तासांत सात फुटांच्या मोठ्या लाटा आणि प्रवाह होते. ज्यामुळे पायलटला जलतरण रद्द करावे लागेल अशी परिस्थिती शेवटच्या काही तासांमधे निर्माण झाली होती. प्रवाह, वारे, आणि मोठ्या लाटांमुळे मार्ग साधारणपणे इंग्रजी S आकाराचा असतो. हा प्रवास 21 मैलांचा होता, पण प्रवाह आणि उच्च लाटांमुळे 29.8 मैल (48 किमी) झाला.
अत्यंत कमी वयात सलग दुसऱ्यांदा सहिष्णू जाधव यांने हे यश मिळवल्यामुळे त्याचे यश हे महाराष्ट्र व भारतातील जलतरणपटूंसाठी मोठी प्रेरणा असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे त्याच्यावर अभिनंदन व कौतुकाचा मोठा वर्षाव होत आहे,कारण दक्षिणकाशी पंढरीचे नाव सहिष्णूमुळे साता समुद्रापलीकडे पोहचले आहे.