- पंढरपूर,टीम—-
संपूर्ण पंढरपूर शहर व उपनगराला लिंक रोड येथील दोन मोठे पाण्याच्या टाक्याद्वारे पाणीपुरवठा केला जातो. येथे या टाक्यांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी टाकण्यासाठी फिल्टरचा शेडलींग टॅंक आहे. हा टॅंक पाणी शुद्ध करतो. मागील चार महिन्यापूर्वी हा टॅंक धुतला होता. आषाढी यात्रेच्या धर्तीवर आता पुन्हा एकदा हा शेडलींग टॅंक स्वच्छ करण्यात आला, यातून निघणाऱ्या पाण्यातून मात्र मोठ्या प्रमाणात मासे निघाले आणि हेच मासे पकडण्यासाठी कॉलेज चौकात एकच धावपळ झाली, यामुळे वाहतूक कोंडी होऊन नागरिकांच्या आरोग्याची अशी ऐसी की तैसी झाल्याचे विदारक चित्र शुक्रवारी सकाळी भर दिवसा पंढरपूरकरांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिले, ज्या काळ्याकुट्ट पाण्यातून मासे पकडले जात होते ते पाहून मात्र मासे खाणाऱ्यांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिल्याचेही दिसून आले.

लिंक रोड भागात पंढरपूर नगर परिषदेचा पाणी शुद्धीकरण प्लांट आहे.या ठिकाणी पाणी फिल्टर करणारा टॅंक अधून मधून धुतला जातो.मागील चार महिन्यापूर्वी हा टॅंक धुतला होता परंतु आता सध्या आषाढी यात्रा व पावसामुळे पुन्हा एकदा शेडलिंक टॅंक स्वच्छ करून घेण्यात आला आहे. या टॅंक द्वारे निघालेले घाण पाणी कॉलेज चौकात तुन खाली ओढ्या ला गेले,परंतु कॉलेज चौकात एका कोपऱ्याला मोठे डबके उघडे आहे,त्याच डबक्यात काही जणांनी जाळी लावून टाकीच्या पाण्यातून येणारे मासे पकडण्याची गर्दी केल्याचे चित्र शुक्रवारी सकाळी दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान पहावयास मिळाले. बऱ्याच महिन्यांनी टॅंक धुतला गेल्यामुळे टॅंक मधून अक्षरशः गटारी सारखे काळ्या रंगाचे व दुर्गंधी युक्त पाणी येत होते परंतु याही पाण्यात मासे पकडणाऱ्यांची मोठी पळापळ होत असल्याचे पहावयास मिळाले.

कॉलेज चौकातील कोपऱ्याला नेमके काय चालू आहे हे पाहण्यासाठी मात्र येणाऱ्या जाणाऱ्यांनी चांगलीच गर्दी केली त्यामुळे येथे काही काळ वाहतूक कोंडी झाली. ज्या काळ्या व दुर्गंधी युक्त पाण्यातून मासे पकडून एका पिशवीत टाकले जात होते ते चित्र पाहून मासे खाणाऱ्यांची मात्र चांगलीच भंबेरी झाल्याची पहावयास मिळाले,आपण हेच मासे खातो काय ही शंका व्यक्त केली गेली. या ठिकाणी निघणारी पाणी स्वच्छ राहिले असते तर कोणीही आक्षेप घेतला नसता परंतु धुतलेल्या टाकीतून जे घाण , दुर्गंधीयुक्त काळे पाणी निघाले त्यातून मासे पकडले जात होते हे चित्र मात्र पंढरी नगरी मध्ये अनेकांनी उड्या डोळ्यांनी पाहिले.
याबाबत नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाची संपर्क केला असता यापुढे फिल्टर टॅंक व टाकी धुतल्यानंतर ज्या ठिकाणी असा प्रकार होतो तेथे कर्मचारी उभे करून दक्षता घेतली जाईल असे उत्तर त्यांनी दिले, परंतु डबक्यामधून वाहणाऱ्या पाण्यातून जे मासे बाहेर काढले गेले त्यांचे काय व ते आता नेमके कुणाकुणाच्या मुखात गेले असतील याबाबत मात्र प्रश्न उपस्थित होत आहे.
संतभूमी पंढरी नगरी मध्ये दिवसाढवळ्या असा प्रकार होत असेल तर मात्र प्रशासन काय करते हा ही सवाल उपस्थितांकडून विचारला गेला कारण संपूर्ण राज्यभरात आईस्क्रीम मध्ये बोट निघालेल्या घटनेची चर्चा आजही सुरू आहे.
