
पंढरपूर, टीम—-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे बिगुल लवकरच वाजण्याची दाट शक्यता निर्माण केली जात असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जात आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे आ. अभिजीत पाटील यांनी या निवडणुकांबाबत मायक्रो प्लॅनिंग करण्यास सुरुवात केली असून ज्येष्ठ नेते मंडळी, कार्यकर्ते,महिला पदाधिकारी, पक्षाचे पदाधिकारी तरुण सहकारी व इच्छुक उमेदवारांची विचार विनिमय बैठक विठ्ठल कारखान्यावर आयोजित केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत युती व महाविकास आघाडी कडून अद्याप स्थानिक पातळीवर कोणतीही भूमिका स्पष्ट झालेली नसली तरी मात्र नेते मंडळी जोरदारपणे कामाला लागले आहेत. प्रत्येक पक्षाकडून गट व गणनिहाय तसेच शहरांमध्ये ही वार्ड निहाय चाचपणी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून विठ्ठल कारखान्याची चेअरमन आ. अभिजित पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती बाबत 1 नोव्हेंबर रोजी विठ्ठल कारखाना येथे गटनिहाय बैठक आयोजित केली असून दहा वाजता ही बैठक सुरू झाल्यानंतर सुरुवातीला रोपळे त्यानंतर भोसे, करकंब, गोपाळपूर,वाखरी, भाळवणी, लक्ष्मी टाकळी, कासेगाव याप्रमाणे विचार विनिमय बैठक होणार आहे.

याबाबत सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण यांनी पोस्ट केली आहे. अद्यापही युती आघाडी बाबत स्थानिक पातळीवर कोणताही निर्णय झाला नसला तरीही मात्र आ. अभिजीत पाटील हे दंड थोपटून जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुकांच्या मैदानात उतरले असल्याचे पाहावयास मिळत आहे या बैठकीमध्ये इच्छुक उमेदवारांच्या ही मुलाखती होणार असल्याचे सांगितले जात असल्यामुळे इच्छुक मेंबर मंडळींचे मात्र टेन्शन चांगलेच वाढले आहे.
