पंढरपूर, टीम —–
संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऑपरेशन लोटस मोहीम सुरू केली असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे आप-आपले गट तट व नेतेमंडळी व पदाधिकारी शाबूत ठेवण्यासाठी इतरही राजकीय पक्ष मोठ्या ताकदीने मैदानात उतरले असून राजकीय मेळावे व बैठकांची जोरदार सुरुवात झाली असून पंढरी नगरी मधील करकंब येथे काँग्रेस आय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट,शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची विचार विनिमय बैठक रविवारी दुपारी हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी येथे संपन्न होत असून या बैठकीला मनसेसह महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

यंदा पंढरपूरचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिला राखीव असल्यामुळे सत्ताधारी परिचारक गटासह इतर सर्वच पक्षांकडून मोठी मोर्चेबांधणी केली जात आहे. सध्या तरी पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक तिरंगी होणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. विठ्ठल परिवाराचे नेतृत्व विठ्ठलचे चेअरमन आ. अभिजीत पाटील हे करत असून सर्व नवा व जुना विठ्ठल परिवार एकत्र येणार का?याकडे सर्वांशी लक्ष लागले आहे. कारण काही माजी नगरसेवक मंडळींनी मोर्चेबांधणी सुरू केली असून त्या दृष्टीने वेगवान पावलेही उचलली जात आहेत.

राज्यात अद्यापही महायुतीबाबत कुठलाही निर्णय झालेला नसल्यामुळे महायुतीच्या स्थानिक नेतेमंडळी कडून प्रत्येक वार्डामध्ये उमेदवारांबाबत चाचपणी केली जात आहे.

जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या गळ्याला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 5 आमदार लागले आहेत परंतु भारतीय जनता पक्षाच्या जुन्या कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांकडून या नेत्यांना मोठा विरोध होत असल्यामुळे गोरे यांचे ऑपरेशन लोटस यशस्वी होते का नाही ते पाहणे महत्त्वाचे झाले आहे. कारण दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे.

याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी पुढाकार घेत महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचा मेळा एकत्र करण्याचा प्रयत्न केला असून नगरपरिषद,पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार मोर्चे मागणी करत सत्ताधारी पक्षाला चारी मुंड्या चीत करण्यासाठी नेतेमंडळी एक पाऊल पुढे टाकून एकमेकांच्या हातात हात देत एक भक्कम मोट बांधणार असल्याचेही संकेत मिळत आहेत, त्यामुळे जिल्ह्याचे लक्ष पंढरपूर शहर व तालुक्यात होणाऱ्या निवडणुकांकडे लागले आहे कारण पंढरपूरने नेहमीच एक वेगळा पॅटर्न व रणनीती जिल्ह्याला निवडणुकांच्या काळात दाखवून दिली आहे.
